मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजही टॅरिफ वॉरमध्ये भारत कसा ठामपणे उभा राहिला, अमेरिकेससमोर झुकला नाही हे सांगितलं. तसंच इंधनाची कमतरता पडणार नाही यासाठी मोदी सरकार सज्ज आहे असंही ते म्हणाले. दुसरीकडे रोहित पवार यांनी विधानसभेत पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. तर आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यातही शाब्दिक जुगलबंदी पाहण्यास मिळाली. तर राज ठाकरेंनी मनसेचा २० वा वर्धापन दिन रायगडावर साजरा केला. आपण जाणून घेऊ दिवसभरातली पाच महत्त्वाची वक्तव्यं.

अजित पवार विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांचा आरोप

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) व्हीएसआर कंपनीचे संचालक व्ही. के. सिंग यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून कोणती माहिती समोर आली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, आता रोहित पवारांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांचं विमान लँड होत असताना दृष्यमानता कमी होती, तरीही व्ही. के. सिंग यांनी विमान लँड करण्याचा सल्ला दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला. रोहित पवार म्हणाले, जोपर्यंत सीआयडीकडून अधिकृत स्टेटमेंट येत नाही किंवा व्ही. के सिंग माध्यमांसमोर येऊन काही सांगतील तेव्हा आम्ही पुराव्यानिशी उत्तर देऊ. विमान उड्डाणादरम्यान जेव्हा दृष्यमानता तीन हजाराच्या आसपास होती, तेव्हा कॅप्टन कपूर यांनी व्ही. के सिंग यांना फोन केला होता. दृष्यमानता कमी असल्याने टेक ऑफ करू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, तरीही व्ही. के. सिंग यांनी टेक ऑफ करायला सांगितलं”, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

राज ठाकरेंनी सांगितला १९ मार्चचा योगायोग

“दरवर्षी आपण एखाद्या हॉलमध्ये वर्धापन दिन साजरा करतो. तिथे तुम्ही येता. पण यावर्षी मी ठरवलं की ९ तारखेला वर्धापन दिन, १९ तारखेला गुढी पाडवा मेळावा. जे काय बोलायचं ते १९ तारखेलाच बोलून टाकू. म्हणून मग आम्ही ठरवलं की ९ तारखेला सदस्य नोंदणी करावी. काय योगायोग आहे पाहा. पहिली सभा २० वर्षांपूर्वी १९ मार्चला झाली होती. आज २० वर्षांनी गुढीपाडव्याच्या सभेला १९ मार्च हीच तारीख आली. त्यामुळे जल्लोषात, उत्साहात शिवतीर्थावर यावं”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

टॅरिफ वॉरमध्ये भारत अमेरिकेसमोर झुकला नाही- फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे हुकूमशहा असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे गुलाम आहेत अशी टीका खरगेंनी केली होती. याबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “ज्यांचं आयुष्य एका कुटुंबाची गुलामी करण्यात गेलं, त्यांना देश कसा चालवायचा, सार्वभौम कसा ठेवायचा हे कसं माहीत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उर्जा सुरक्षा जपली आहे. तसं केलं नसतं तर भारताची अवस्था काय झाली असती हे आपल्याला ठाऊक आहे. टॅरिफ वॉरच्या दरम्यानही भारत अमेरिकेसमोर झुकला नाही कणखरपणे उभा राहिला. भारताने अनेक देशांसोबत टॅरिफ अ‍ॅग्रीमेंट केले, त्यामुळे ज्यांनी टॅरिफ वॉर केला, त्यांना देखील मागे हटावं लागले. त्यामुळे एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी अशा प्रकारचं भाष्य करणे हास्यास्पद आहे” अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी मल्लिकार्जुन खरगेंवर केली.

सुधीर मुनगंटीवार शेलारांना उद्देशून काय म्हणाले?

“सन्माननीय मंत्री महोदय (आशिष शेलार) अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रश्नांचं उत्तरं देत आहेत. तुमचं उत्तर ऐकल्यावर खरंच तुम्ही चिरंजीवी मंत्री असावं किंवा त्यापेक्षाही तुम्ही आणखी पुढे जावो अशा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. मात्र, एक गोष्ट लक्षात आली की भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर तुमचं उत्तर अतिशय सकारात्मक पद्धतीने आलं, कारण आज तुम्ही खूश आहात. तुम्ही खूश आहात तर मग आणखी चार ते पाच प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत”, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी भरती परीक्षांच्या मुद्यांवरून मंत्री आशिष शेलार यांना काही प्रश्न विचारले.

आशिष शेलार यांचं खुमासदार शैलीत मुनगंटीवार यांना उत्तर

सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षांच्या मुद्यांवरून विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, “सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या भरती परीक्षांबाबत तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हे प्रश्न सभागृहात मांडताना त्यांनी माझी प्रशंसा केली त्याबाबत त्यांचे आभार. तसेच मला पूर्ण विश्वास आहे की सुधीर मुनगंटीवार यांनी माझी प्रशंसा अगदी मनापासून केली असावी. याबरोबरच मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या मनात माझ्याविषयी दुसरा कोणताही विषय अकारण असणार नाही. मात्र, या चर्चेमुळे अकारण विषय बाहेर जाऊ नये म्हणून मी चिरंजीवी मंत्री राहील की नाही? हे मला माहिती नाही. पण अभिमन्यू सारखं मी चक्रव्यूहात मरून पडणार नाही एवढंच त्यांना सांगतो”, असं म्हणत आशिष शेलार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला.