महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवारपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलंय. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. असं असतानाच आज सकाळी नऊच्या सुमारास राज ठाकरेंनी ट्विटरवरुन पुन्हा एकदा आपली भोंग्यांविरोधातील भूमिका स्पष्ट करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केलाय.

नक्की वाचा >> “राज ठाकरेंसारख्या लोकांना…”; राज ठाकरेंच्या भोंगाविरोधी आवाहनानंतर मोदींचा उल्लेख करत राष्ट्रवादीचं प्रतिआवाहन

राज ठाकरेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे भाषणादरम्यान, “ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील, बंद” असं म्हणताना दिसत आहेत.

राज यांनी काल जारी केलेल्या पत्रात काय म्हटलंय?
जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या, असं राज यांनी मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.

नक्की वाचा >> “…आणि महाविकास आघाडी राज ठाकरेंना तुरुंगात डांबेल”; चंद्रकांत पाटलांची पोस्ट चर्चेत

…तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल
मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी. रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

नक्की वाचा >> राज ठाकरेंनी आवाहनाचं पत्रक पोस्ट केल्यानंतर तासाभरातच राऊतांचं ट्विट; शरद पवारांना टॅग करत म्हणाले, “निकले हैं वो लोग हमारी…”

याची हिंदुंनी काळजी घ्यावी
देशातील शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. आपण धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात येऊन द्यावीत. मशिदीत बांग सुरू झाल्यावर पोलिसांच्या १०० क्रमांकावर भोंग्याचा त्रास होत असल्याची तक्रार करावी. ती रोज करावी, असा कार्यक्रमही राज ठाकरे यांनी जाहीर केला. तसेच ज्या मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत त्याचे स्वागत करत त्या मशिदीच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही याची हिंदुंनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

एवढ्या हिंदुंना डांबू शकत नाही
हा विषय एका दिवसात सुटणार नाही. प्रत्येक राज्यातील हिंदुंनी आपापल्या सत्ताधारी-राज्यकर्त्यांना हिंदुंची ताकद काय आहे हे दाखवून द्यावे. देशाच्या कारागृहात तमाम हिंदुंना डांबणे सरकारला शक्य होणार नाही हे लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज यांचा पवारांना टोला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे अशी भूमिका जाहीर केली होती. ते तुम्ही ऐकणार आहात की नाही. की सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात, याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर होऊन जाऊ दे, असे आव्हान राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.