Raja Shivaji Movie review by Aditya Thackeray : महाराष्ट्रा दिनाचे औचित्य साधून रितेश देशमुख यांचा अतिमहत्त्वाकांक्षी असलेला चित्रपट राजा शिवाजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता होती. चित्रपटातील गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर ही उत्सुकता शिगेला पोहचली. दरम्यान, पहिल्या दिवशी या चित्रपटाची तुफान कमाई झाली असून अनेक मान्यवरांनी पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही हा चित्रपट पाहिला असून चित्रपट पाहू आल्यानंतर त्यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, माझ्याकडे शब्द नाहीयत, या चित्रपटाचं वर्णन करायला. ज्यांनी चित्रपट बनवला आहे त्यांना मानाचा मुजरा. कारण, आपल्या दैवताचा इतिहास सिनेमांमार्फत जगासमोर येत आहे, याचा अभिमान आहे. आपल्या भूमितील शिवाजी महाराज या चित्रपटाच्या मार्फत पाहू शकलो, अनुभवलो शकलो.
दिल्लीला कळावं की महाराष्ट्राची माती काय आहे?
चित्रपटाविषयी कौतुक झाल्यानंतर त्यांनी हा चित्रपट चौकाचौकात दाखवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “प्रत्येक चौकाचौकात हा चित्रपट दाखवण्यासारखा आहे. शाळेच्या मुलांना तर दाखवाच, अशी माझी आग्रही विनंती आहे. हा चित्रपट लाल किल्ल्यावर दाखवावा. दिल्लीला कळावं की महाराष्ट्राची माती काय आहे. हे लाल किल्ल्यावरून दिसू दे.”
‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने हिंदीसह मराठी सिनेविश्व गाजवणाऱ्या रितेश देशमुखने आता दिग्दर्शनात पदार्पण केलंय. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रितेशने साकारली असून सईबाईंच्या भूमिकेत त्याची पत्नी जिनिलीया देशमुख आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर ‘राजा शिवाजी’ चित्रपट १ मे २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
