नगर लोकसभा मतदारसंघात मोदी लाटेवर आरूढ झालेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवताना राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा २ लाख ९ हजार १२२ मतांनी मोठा पराभव केला. गांधी यांना ६ लाख ५ हजार १८५ तर, राजळे यांना ३ लाख ९६ हजार ६३ मते मिळाली. या मतदारसंघातून गांधी तिसऱ्यांदा विजयी झाले असून या वेळी त्यांनी विक्रमी मते घेतली. मतदारसंघातील शेवगाव-पाथर्डी वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघात गांधी यांनीच आघाडी घेतली.
गांधी यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच ६ हजार ८०० मतांची आघाडी घेऊन ती पुढे वाढवत नेली. राजळे यांना ही आघाडी तोडताच आली नाही. पुढच्या प्रत्येक फेरीत त्यांनी ही आघाडी वाढवत मोठय़ा विजयाकडे वाटचाल केली. बाराव्या फेरीत गांधी यांनी मताधिक्याचा १ लाखाचा तर पंचविसाव्या फेरीत २ लाखांचा टप्पा ओलांडला. तेराव्या फेरीत ही मते ३ लाख ३३ हजारांवर नेत त्यांनी याआधीच्या त्यांच्याच मतांचाही टप्पाही पार केला. पहिल्याच फेरीत गांधी यांनी आघाडी घेतल्याचे समजताच नगर शहरासह मतदारसंघातील तालुक्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. फेरीनिहाय त्यांची आघाडी वाढत गेली, तसतसा हा जल्लोष वाढत गेला. नगर येथील लक्ष्मी कारंजावरील पक्षाच्या कार्यालयात सकाळीच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. फेरीनिहाय निकाल सुरू होताच ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होईपर्यंत गांधी त्यांच्या निवासस्थानीच होते. येथेही सकाळीच समर्थकांची मोठी गर्दी झाली. येथेही मोठा जल्लोष सुरू होता. आठव्या फेरीनंतर गांधी गुलाल घेऊनच मतमोजणी केंद्रात आले. ते येताच केंद्रासह परिसरातही मोठा जल्लोष झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार राजळे मात्र मतमोजणीकडे फिरकलेच नाहीत.  
गांधी यांनी प्रतिस्पर्धीच नव्हेतर पक्षांतर्गत विरोधक, मित्रपक्षातील विरोधक या सर्वानाच या निकालाने सणसणीत चपराक दिली आहे. निवडणुकीतील उमेदवारीसाठीच त्यांना संघर्ष करावा लागला, मात्र पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील पहिल्याच यादीत उमेदवारी मिळवून पुढे त्यांनी निवडणूकही सहजगत्या जिंकली. राजळे यांना लोकसभेत सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वेळी त्यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली होती, त्या वेळीही गांधी यांनीच त्यांचा पराभव केला होता.
उमेदवारांना मिळालेली मते
दिलीप गांधी (भाजप)- ६ लाख ५ हजार १८५ (विजयी), राजीव राजळे (राष्ट्रवादी)- ३ लाख ९६ हजार ६३, किसन काकडे (बसप)- ८ हजार ३८६, अजय भारस्कर (बहुजन मुक्ती पार्टी)- ६ हजार ३, शिवाजी डमाळे (भा. नव. सेना)- १ हजार ३८५, दीपाली सय्यद (आम आदमी पार्टी)- ७ हजार १२०, पोपट फुले (म. परिवर्तन सेना)- १ हजार ६१, अनिल धनवट (अपक्ष)- ३ हजार ८६, बबनराव कोळसे पाटील (अपक्ष)- १२ हजार ६८३, विकास देशमुख (अपक्ष)- २ हजार २०२, पेत्रस गवारे (अपक्ष)- २ हजार ५२५, लक्ष्मण सोनाळे (अपक्ष)- ३ हजार ४९७, श्रीधर दरेकर (अपक्ष)- ५ हजार ६४९. अवैध मते- ४६२, नोटा- ७ हजार ४७३. एकूण मते- १० लाख ६२ हजार ३१८.
विधानसभा मतदारसंघनिहाय अनुक्रमे दिलीप गांधी व राजीव राजळे यांना मिळालेली मते अशी-शेवगाव-पाथर्डी ८९ हजार ७६४ व १ लाख १ हजार ५४३, राहुरी १ लाख १ हजार ७५१ व ६० हजार ३५०, पारनेर १ लाख ३ हजार ८ व ६१ हजार ९२१, नगर शहर ८९ हजार २५८ व ५० हजार ९९३, श्रीगोंदे १ लाख १३ हजार ६४३ व ५५ हजार ३८९, कर्जत-जामखेड १ लाख ६ हजार ५५२ व  ६५ हजार ३७३.