राजापूर: राजापूर तालुक्यातील आडीवरे येथील श्री नगरेश्वर महादेव मंदिरात सुमारे १२५ वर्षांपूर्वीचा (इ.स. १९००) एक महत्त्वपूर्ण ताम्रपट आढळून आला असून, त्यातून मंदिराच्या जीर्णोद्धाराची ऐतिहासिक नोंद प्रकाशात आली आहे.

मंदिराच्या सभामंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लाकडी तुळईवर कोरलेला हा ताम्रपट देवनागरी लिपीतील मराठी भाषेत असून दहा ओळींचा आहे.
या ताम्रपटात मंदिराच्या जीर्णोद्धाराची तपशीलवार माहिती नोंदवण्यात आली असून, त्या काळातील सामाजिक रचना, दाते वर्ग तसेच ब्रिटिशकालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांचा धार्मिक कार्यातील सहभाग यावर प्रकाश पडतो.

इतिहास संशोधनाच्या दृष्टीने हा दस्तऐवज महत्त्वाचा मानला जात आहे. ताम्रपटाचे संशोधन सागर मुंढे यांनी केले असून वाचन अनिल दुधाणे यांनी केले आहे. या कार्यात एम. एन. कामत यांचे सहकार्य लाभले असून माहितीचे संकलन अनिल किसन दुधाणे यांनी केले आहे. इतिहास अभ्यासक विनोद पवार यांनी हा ताम्रपट संशोधकांसाठी मौल्यवान ठेवा ठरणार असल्याचे सांगितले.

ताम्रपटावरील मजकुरानुसार, शालिवाहन शक १८२२, प्लवंग नाम संवत्सर, ज्येष्ठ वद्य पंचमी, रविवार (१७ जून १९००) रोजी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण करण्यात आला. हा जीर्णोद्धार आडीवरे वाड्यातील नवेदर समूहातील भिडे कुलोत्पन्न वासुदेवराव यांनी केला होता. ते नारायणराव यांचे नातू आणि गोविंदराव यांचे पुत्र होते. विशेष म्हणजे, वासुदेवराव त्या काळात पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमध्ये सब-डिव्हिजनल ऑफिसर पदावर कार्यरत होते.
ताम्रपटाच्या प्रारंभी ‘श्री गजानन प्रसन्न’ व ‘श्री महाकाली प्रसन्न’ असे मंगलाचरण असून, जीर्णोद्धार ‘श्री गौरीशंकराच्या प्रेरणेने’ केल्याचा उल्लेख आहे. यावरून शैव व शक्त उपासनेचा समन्वय दिसून येतो. शेवटी ‘सदाशिवार्पणमस्तु’ व ‘शुभ भवतु’ अशा पारंपरिक वाक्यांनी कार्याचे दैवी अर्पण व्यक्त करण्यात आले आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि समुद्रकिनाऱ्यालगत वसलेल्या राजापूर तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ब्रिटिश काळात राजापूर बंदर निर्यात केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. गेल्या काही वर्षांत तालुक्यात विविध ऐतिहासिक दस्तऐवज आढळत असून, या ताम्रपटामुळे त्या इतिहासात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे.