राजापूर – राजापुर शहरात आषाढी एकादशी आणि मोहरम निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून पोलीस बंदोबस्त असतानाही शनिवारी सायंकाळी उशिरा दिवसाढवळ्या झालेल्या चोरीने शहरासह तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील लॅविश अपार्टमेंट या निवासी संकुलामध्ये चोरट्यांनी तब्बल १२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची माहीती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अमित यादव यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या झालेल्या चोरी नंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संतोष भामुद्रे यांच्या मालकीचा लॅविश या निवासी संकुलामध्ये सदनिका आहे.

बुलढाणा येथील मुळ रहिवाशी असलेले भामुद्रे कुटुंबिय गेली अनेक वर्ष राजापूर येथे वास्तव्याला असून ते आठवडा बाजारात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. ते शनिवारी सायंकाळी कामानिमित्ताने बाहेर गेले होते. त्याचवेळी त्यांची पत्नी व मुलेही घराबाहेर होती.

सायंकाळी उशिरा घरी आले असता त्यांना सदनिकेचा दरवाजा उघडा व घरातील कपाट विस्कटलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबतची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरिक्षक अमित यादव, पोलीस उपनिरिक्षक श्री. उबाळे, श्री. शेख यांच्यासह अन्य सहकारी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होवून पंचनामा केला. यामध्ये रोख ९ लाख रूपये आणि ३ लाख ८० हजार रूपयांचे दागिने असे मिळून एकूण १२ लाख ८० हजार रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला.

दरम्यान, दिवसाढवळ्या चोरी झाल्याने यामध्ये स्थानिक माहितगाराचा हात असण्याची शक्यता प्रथमदर्शनी वर्तविली जात आहे. यातील चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करुन या घरफोडीच्या पार्श्वभुमीवर सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन राजापूरचे पोलीस निरिक्षक अमित यादव यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.