राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे निर्माण झालेली यंदाची पहिली पूरस्थिती ओसरली. पावसाने विश्रांती घेतल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली असून शहरातील जवाहर चौकासह पूरग्रस्त भागातील पाणी उतरले आहे. त्यामुळे विस्कळित झालेले जनजीवन पूर्वपदावर आले असून शहरातील बाजारपेठ आणि वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ आणि नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल व कचरा साचला होता. राजापूर नगरपालिकेने तातडीने साफसफाई मोहीम हाती घेत शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेतील चिखल व कचरा हटविला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

रविवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले होते. अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी शहरातील बाजारपेठेसह इतर सखल भागांत शिरले होते. त्यामुळे संपूर्ण दिवस व्यवहार ठप्प झाले होते आणि वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला होता.

सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नदीतील पाणी झपाट्याने उतरले. शीळ–गोठणे–दोनिवडे–चिखलगाव मार्ग, डोंगर मिरासवाडी–गणेशवाडी रस्ता, उन्हाळे–रेल्वे स्टेशन मार्ग तसेच राजवाडी–वाडापेठ पूल यांवरील पूराचे पाणीही ओसरले. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. पूराचे पाणी नदीकाठच्या भातशेतीत शिरल्याने शेतीची कामे दिवसभर ठप्प झाली होती. मात्र, पाणी ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा भातलागवडीच्या कामांना वेग दिला आहे.

दरम्यान, वादळी पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. ससाळे येथील धिरेंद्र तांबे यांच्या घराचे नुकसान झाले, तर शकुंतला गोरे यांच्या घरावरील कौले उडाली. सोलगाव येथील गांगो गुरववाडीत झाड कोसळून तीन वीजखांब मोडल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.