राजापूर : राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील गंगातीर्थक्षेत्री पाताळातून अवचितपणे प्रकटणाऱ्या आणि तितक्याच रहस्यमयरीत्या अदृश्य होणाऱ्या गंगामाईच्या चमत्काराने विज्ञानालाही आव्हान दिले असताना, आता येथे आढळलेल्या प्राचीन शिलालेखामुळे या स्थळाच्या ऐतिहासिक महत्त्वात नवी भर पडली आहे. ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळातील चौदा कुंडांपैकी काशीकुंडामध्ये हा शिलालेख सापडला आहे.

शिलालेखावर ‘चरण रज भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर’ अशी अक्षरे कोरलेली असून ती आजही स्पष्ट दिसून येतात. अक्षरांची वळणदार रचना लक्षवेधी आहे. मात्र, हा शिलालेख नेमका कोणत्या कालखंडातील आणि कोणी कोरला, याचा ठोस उल्लेख आढळत नाही. अक्षरांच्या शैलीवरून हा शिलालेख सोळाव्या किंवा सतराव्या शतकातील असावा, असा अंदाज पुणे येथील इतिहास संशोधक व शिलालेख अभ्यासक अनिल दुधाणे यांनी व्यक्त केला आहे.

गंगामाईचे अद्भुत वास्तव्य

उन्हाळे येथील गंगातीर्थक्षेत्री गंगामाई पाताळातून अवचित प्रकटते आणि काही काळानंतर अचानक निर्गमन करते, अशी श्रद्धा आहे. या काळात देश-विदेशातील भाविक येथे गंगास्नानासाठी गर्दी करतात. गंगामाईच्या आगमन-निर्गमनाचे शास्त्रीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या गंगामाई प्रवाहीत असून पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मूळ गंगेसह येथील चौदा कुंडांमध्ये काशीकुंडाला विशेष महत्त्व आहे. गंगापुत्र ज्या ठिकाणी कळशी बुडवून पाणी घेतात, त्या ठिकाणच्या दगडावर हा शिलालेख कोरलेला आढळतो.

इतिहासातील उल्लेख

मेदीनी पुराण मध्ये राजापूरच्या प्रसिद्ध गंगेचा उल्लेख आढळतो. सातवाहन राजा गांडरादित्याने येथे चौदा कुंडांचे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम केल्याचे मानले जाते. तसेच शालिवाहन राजा सोमेश्वर (इ.स. १२५५-१२६५) यांनीही येथे वास्तव्य केल्याचे उल्लेख आहेत.

इतिहासातील काही बखरींनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी दोनदा गंगास्नान केल्याचे सांगितले जाते. तसेच इ.स. १६६४ मध्ये त्यांच्या विनंतीवरून गागाभट्ट यांनी येथे विद्वानांची सभा भरविल्याचे ऐतिहासिक दाखल्यांमध्ये नमूद आहे. राजापूरच्या या गंगातीर्थक्षेत्राला लाभलेल्या ऐतिहासिक वारशामध्ये काशीकुंडातील शिलालेखाची भर पडल्याने संशोधकांसाठी अभ्यासाचे नवे दालन खुले झाले आहे.

‘चरणरज भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर’ म्हणजे काशी निवासी जोशी वंशातील भास्कर, जे सोमेश्वरकर म्हणून ओळखले जातात, आणि ज्यांना चरणरज समान पवित्र मानले गेले आहे.

दृष्टीक्षेपात : शिलालेखाचा अर्थ

  • चरण रज – पवित्र पादधूळ (गुरू/देवाच्या चरणांची रज)
  • भास्कर – सूर्य; तसेच व्यक्तिनाम
  • काशी – वाराणसी नगरी
  • जोशी – ज्योतिषी/ब्राह्मण आडनाव
  • सोमेश्वरकर – सोमेश्वर क्षेत्राशी संबंधित उपाधी