रत्नागिरी : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे भरलेल्या कोकण हापूस आंबा महोत्सवात राजापूरच्या हापूस आंब्याने अक्षरशः दिल्लीकरांची मने जिंकली. कोकणच्या सुपीक मातीत पिकलेल्या सुगंधी, रसाळ आणि दर्जेदार हापूसला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की अवघ्या तीन तासांत तब्बल १ हजार  डझन आंब्यांची विक्री करण्यात आली.

राजापूर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा महोत्सव मोठी संधी ठरली. सकाळपासूनच महाराष्ट्र सदन परिसरात आंबा खरेदीसाठी गर्दी उसळली होती. अनेक दिल्लीकरांनी हापूसची चव चाखत त्याच्या गोडव्याचे आणि सुगंधाचे कौतुक केले. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या राजापूर हापूसने आपल्या गुणवत्तेची छाप पुन्हा एकदा उमटवली.

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ओंकार प्रभुदेसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक होत आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांनी नियोजनबद्ध समन्वय साधत या महोत्सवाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.