राजापूर : राजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून रविवारी सकाळ पासूनच पुराचे पाणी शहरातील जवाहर चौकात शिरले. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून जवाहर चौकातून होणारी एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरातील बंदरधक्का, गणेशघाट परिसर तसेच अनेक अंतर्गत मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातही मुसळधार पावसामुळे झाडे व घरे कोसळण्याच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

शनिवारी दिवसभर आणि रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुना नदीच्या पुराचे पाणी रविवारी सकाळी जवाहर चौकात पोहोचले. चौकातील टपऱ्या पाण्याखाली गेल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून येथील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. राजापूर-शिळ-गोठणे-दोनिवडे मार्गावरही पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. बंदरधक्का आणि गणेशघाट परिसरही जलमय झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

सततच्या पावसामुळे पुराचा धोका ओळखून नदीकाठावरील व्यापारी आणि नागरिकांनी शनिवारीच आपल्या मालमत्तेची सुरक्षित ठिकाणी हलवणूक केली होती. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान टळल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातही पावसाचा तडाखा कायम आहे. नाटे-बाणेवाडी येथे भागीरथी काशिनाथ चव्हाण यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले असून पोकळेवाडीपर्यंतची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. कातळी गावात अ. रहीम अ. लतिफ सोलकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने घराचे नुकसान झाले. या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी टळली आहे.
राजापूर-गोठणे-दोनिवडे-सौंदळ मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

पन्हाळे तर्फे राजापूर येथील बौद्धवाडीला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तालुक्यातील अन्य अनेक भागांतही वीजपुरवठा विस्कळीत झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.दरम्यान, अतिवृष्टीमुळे कशेळी येथील देवघळी बीच सनसेट पॉइंट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

शहरातील पूरस्थिती आणि ग्रामीण भागातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.