राजापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ब्रिटिशकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या राजापूर येथील ऐतिहासिक वखारीच्या इमारतीच्या सुशोभीकरणातील निकृष्ट दर्जाचे काम पहिल्याच पावसात उघड झाले आहे. परिसरात करण्यात आलेले बांधकाम कोसळले असून, काही ठिकाणी चिरेबंदी बांधकाम खचून त्याला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकाराची दखल घेत लोकनियुक्त नगराध्यक्षा अॅड. हुस्नबानू खलीफे यांनी ठेकेदाराविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.गेल्या दीड वर्षांपासून शासनाच्या निधीतून ऐतिहासिक वखारीच्या परिसराचे पर्यटनदृष्ट्या सुशोभीकरण सुरू आहे. मात्र, काम पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्या पावसात बांधकामाचा काही भाग कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी चिरेबंदी बांधकाम खचल्याने आणि त्याला तडे गेल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप होत आहे.
घटनास्थळी भेट देऊन नगराध्यक्षा अॅड. खलीफे यांनी ढासळलेल्या व खचलेल्या बांधकामाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी ठेकेदाराने निष्काळजीपणा करत निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी, तसेच जिल्हाधिकारी आणि पर्यटन संचालनालयाकडे तातडीने तक्रार दाखल करावी, असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.
या पाहणीवेळी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अभियंता स्वप्निल पड्यार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव आणि संदेश जाधव उपस्थित होते.राजापूरला व्यापार-उदीमांचे शहर म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या ब्रिटिशकालीन वास्तूंपैकी ऐतिहासिक वखार ही महत्त्वाची वास्तू मानली जाते. या वारसा वास्तूचे जतन आणि पर्यटनदृष्ट्या आकर्षक रूप देण्याच्या उद्देशाने सुशोभीकरण हाती घेण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात बांधकामाचा दर्जा उघड झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
