राजापूर :  राजापूर नगरपालिकेच्या डिसेंबर २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका अफरोज महमंद झारी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. इतर मागासवर्गीय (नाभिक) जातीचे त्यांचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले. त्याबाबतचे अधिकृत पत्र नुकतेच राजापूर नगरपालिकेला प्राप्त झाले असून, त्यामुळे पालिकेतील एक जागा रिक्त झाली आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दोन दिवसांपूर्वी अफरोज झारी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. विशेष म्हणजे, याच प्रभागातून त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवार निलोफर मुकादम यांचेही जात प्रमाणपत्र यापूर्वी समितीने अवैध घोषित केले आहे. समितीच्या निर्णयानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने अफरोज झारी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले. या आदेशाला राजापूर नगरपालिकेने दुजोरा दिला आहे. सध्या राजापूर नगरपालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्षांसह महाविकास आघाडीकडे १० नगरसेवक आणि एक स्वीकृत सदस्य असे एकूण ११ सदस्यांचे संख्याबळ होते. विरोधी महायुतीकडे १० नगरसेवक आणि एक स्वतंत्र स्वीकृत सदस्य असे ११ सदस्य आहेत. अफरोज झारी यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने महाविकास आघाडीचे संख्याबळ घटले असून, पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ आता काठावर आले आहे. त्यामुळे आगामी काळातील निर्णयप्रक्रियेवर या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कास्टिंग व्होटची वेळ येणार?

नगरपालिकेतील बदललेल्या संख्याबळामुळे महत्त्वाच्या विषयांवरील मतदानावेळी नगराध्यक्षांना निर्णायक मत (कास्टिंग व्होट) वापरण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, रिक्त झालेल्या जागेवरील पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि संभाव्य पोटनिवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.