रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदेशीर मद्यतस्करीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर तालुक्यातील पन्हाळी तर्फे सौंदळ येथे जंगलमय भागात लपवून ठेवलेल्या बारा चाकी कंटेनरवर छापा टाकत तब्बल १ कोटी ९१ लाख ९६ हजार रुपये किमतीचा गोवा बनावटीचा बेकायदेशीर दारूसाठा आणि कंटेनर जप्त करण्यात आला.
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील पन्हाळी येथील हॉटेल समर्थजवळ, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलात हा कंटेनर संशयास्पदरीत्या लपवून ठेवण्यात आला होता. गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून ही धडक कारवाई केली.
छाप्यात कंटेनरची झडती घेतली असता महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ‘रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडचा तब्बल १६०० पुठ्ठ्यांचा साठा आढळून आला. यामध्ये एकूण १३,८२४ बल्क लिटर मद्य असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या अवैध दारूसाठ्याची किंमत तब्बल १ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
कारवाईदरम्यान कंटेनरवर प्रथमदर्शनी राजस्थानचा आरजे १४ जी आर ६००४ हा क्रमांक असलेली नंबर प्लेट लावण्यात आल्याचे आढळले. मात्र अधिक तपासणी केली असता या नंबर प्लेटखाली वाहनाचा मूळ क्रमांक एचआर ६९ ई ३४९० असल्याचे उघड झाले. त्यामुळे अवैध मद्याची वाहतूक करण्यासाठी बनावट नंबर प्लेटचा वापर करून यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, उत्पादन शुल्क पथकाची चाहूल लागताच कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. फरार चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल होत असताना अवैध मद्याची वाहतूक आणि विक्री वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने महामार्गावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पन्हाळी येथील ही कारवाई त्याच मोहिमेतील मोठी कामगिरी मानली जात आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त स्नेहलता श्रीकर आणि रत्नागिरी अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर, दुय्यम निरीक्षक प्रदीप गुरव तसेच जवान अतुल वसावे, विशाल विचारे, मानस पवार आणि अनुराग बर्वे यांनी केली.गणेशोत्सवाच्या तोंडावर महामार्गालगत जंगलात लपवून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा मद्यसाठा उघडकीस आल्याने अवैध मद्यतस्करांचे धाबे दणाणले आहेत.
