राजापूर : राजापूर तालुक्यातील साखर चव्हाणवाडी येथील ग्रामदैवत परिसरात सापडलेल्या शिलालेखामुळे स्थानिक इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा समोर आला आहे. दगडी बांधीव बारव (तलाव) काठावर आढळलेल्या या शिलालेखात तलावाच्या जीर्णोद्धाराची नोंद करण्यात आली असून, त्या काळातील सार्वजनिक कामांच्या परंपरेवर प्रकाश पडतो.
सहा ओळींच्या या शिलालेखात देवनागरी लिपीत मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. गुळगुळीत चौकोनी दगडावर कोरलेला हा लेख दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने काहीसा झिजलेला असला, तरी छाप घेतल्यानंतर मजकूर स्पष्टपणे वाचता येतो. सध्या ही शिळा मंदिर परिसरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.
शिलालेखातील उल्लेखानुसार, “सदर तलावाची दुरुस्ती लोकल फंडातून व पुणे मुक्कामी असलेले वकील सदाशिव विश्वनाथ पटवर्धन यांच्या सहाय्याने सन १८८६ मध्ये करण्यात आली.” या नोंदीवरून त्या काळात स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचे अस्तित्व तसेच सार्वजनिक कामांसाठी निधी उभारणीची पद्धत विकसित झाल्याचे दिसून येते.
तलाव हा त्या काळातील प्रमुख पाणीपुरवठ्याचा स्रोत असल्याने त्याची दुरुस्ती करणे हे लोकहिताचे अत्यंत महत्त्वाचे कार्य होते. स्थानिक निधीसोबतच पुण्यातील सुशिक्षित व्यक्तींनी दिलेले सहकार्य समाजातील सार्वजनिक जाणीव आणि सहभागाची परंपरा अधोरेखित करते.
इतिहास अभ्यासकांच्या मते, हा शिलालेख प्राचीन आणि आधुनिक काळाच्या संक्रमणाचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे. धार्मिक कार्यांच्या नोंदींपलीकडे जाऊन सार्वजनिक कामांची लेखी नोंद ठेवण्याची परंपरा याच काळात रूढ होत गेल्याचे हे उदाहरण मानले जाते. दरम्यान, पटवर्धन घराण्याचा या भागाशी ऐतिहासिक संबंध असल्याची माहितीही पुढे आली आहे.
स्वातंत्र्यसैनिक अच्युतराव पटवर्धन यांचे नातेवाईक असलेल्या या घराण्यातील सीताराम विश्वनाथ पटवर्धन यांनी ब्रिटिश काळात एज्युकेशन डायरेक्टर म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या पुढाकारातून राजापूर येथे ‘विश्वनाथ विद्यालय’ सुरू झाले तसेच राजापूर हायस्कूलच्या उभारणीतही त्यांचे योगदान असल्याचे सांगितले जाते.
या शिलालेखाच्या शोध व अभ्यासात विनोद पवार, मनोहर धुरी व पराग पारकर यांचे सहकार्य लाभले असून, शिलालेखाचे वाचन अनिल दुधाणे यांनी केले आहे. स्थानिक इतिहासाच्या दृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
