रत्नागिरी : सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव दाखल करून फेरफार मंजूर करण्यासाठी तब्बल २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील दोन महिला महसूल अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारताना झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची मौजे जवळेथर येथील वडिलोपार्जित जमीन असून त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव नोंदविण्यासाठी फेरफार प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी तक्रारदार १३ मे २०२६ रोजी मिळंद येथील तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी कोतवाल संजना नंदकुमार माने (वय ४१) यांनी मंडळ अधिकारी पुनम जससिंग गावीत (वय ३७) यांच्या वतीने काम मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. फेरफार मंजूर करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवायचे असल्यास पैसे द्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचा आरोप आहे.
लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १४ मे रोजी मागणीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एसीबीने सापळा रचून कारवाईची योजना आखली. तडजोडीनंतर २५ हजारांऐवजी २० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित करण्यात आले. ठरल्याप्रमाणे तक्रारदार मिळंद तलाठी कार्यालयात गेले असता पंचासमक्ष कोतवाल संजना माने यांनी २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारल्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी पुनम गावीत यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यावेळी गावीत यांनीही त्यास संमती दर्शवल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोघींनाही ताब्यात घेतले.
ही कारवाई रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली. राजापूर पोलीस ठाण्यात संबंधित दोघींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
