राजापूर : उंचावर काम करताना शिडीवर सतत चढ-उतार करावा लागणे, अरुंद जागेत शिडी लावण्याची अडचण, जड साधनांमुळे वाढणारा थकवा आणि अपघाताचा धोका या सर्व समस्यांवर राजापूरमधील विद्यार्थ्यांनी भन्नाट तोडगा शोधला आहे. ‘एक्स्टेंडेबल मेकॅनिकल लेग्स’ या नाविन्यपूर्ण उपकरणाने राज्यस्तरीय ‘टेक्नोव्हेशन २०२५-२६’ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

विज्ञान आश्रम, पाबळ आणि स्टार्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘टेक्नोव्हेशन २०२५-२६’ प्रकल्प प्रदर्शनात राज्यातील ३९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शेती, पर्यावरण आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित विविध तांत्रिक मॉडेल्स सादर करण्यात आली; मात्र राजापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने परीक्षकांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांची अभिनव झेप

राजापूर हायस्कूल येथील आयबीटी शिक्षक अनिकेत मांजलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुजल रणबले आणि सुयश कुमडेकर यांनी हे उपकरण विकसित केले. दिनेश शिंदे, देवेंद्र मांजलकर आणि राहुल मांजलकर यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कल्पनांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने आयोजित प्रदर्शनात त्यांच्या मॉडेलने प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशाबद्दल राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह प्रकाश भावे, अध्यक्ष डॉ. छाया जोशी, उपाध्यक्ष अभय मेळेकर, कार्यवाह जगदीश पवार, खजिनदार नंत रानडे, मुख्याध्यापक अरुण पोवार, पर्यवेक्षिका दर्शना मांडवकर आणि शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

वैशिष्ट्यपूर्ण ‘एक्स्टेंडेबल मेकॅनिकल लेग्स’

‘एक्स्टेंडेबल मेकॅनिकल लेग्स’ हे उपकरण मानवी पायांना बाह्य सांगाड्यासारखे जोडले जाते. या यंत्रणेमुळे कारागीरांची उंची गरजेनुसार तब्बल तीन फुटांपर्यंत वाढविता येते.

  • मजबूत पण साध्या मेकॅनिझमवर आधारित रचना
  • वजनाला हलके आणि वापरण्यास सुरक्षित
  • शिडीशिवाय उंचावर स्थिर उभे राहण्याची सुविधा
  • अरुंद जागेत सहज हालचाल
  • अपघाताचा धोका कमी, कार्यक्षमता अधिक

या उपकरणामुळे कारागीरांना वारंवार शिडी चढ-उतार करण्याची गरज राहत नाही. परिणामी शारीरिक थकवा कमी होतो, कामाचा वेग वाढतो आणि सुरक्षिततेची पातळी उंचावते.

राजापूरच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले हे उपकरण भविष्यात बांधकाम, रंगकाम, इलेक्ट्रिकल दुरुस्ती अशा विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.