राजापूर : कोकणातील इतिहासाच्या दालनात नवे पान जोडणारी महत्त्वपूर्ण नोंद राजापूर तालुक्यातील तेरवण येथे झाली आहे. निसर्गरम्य परिसरात एकाच खडकातून कोरलेली वैशिष्ट्यपूर्ण एकाश्म लेणी येथे आढळून आली असून, तिची रचना अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘रामलिंग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लेणीमध्ये दोन गर्भगृहे असून ती आतून परस्परांना जोडलेली आहेत, ही तिची विशेष वैशिष्ट्यपूर्ण बाब मानली जात आहे.

या लेणीतील एका गर्भगृहात अधिष्ठान कोरलेले असून दुसरे गर्भगृह रिक्त आहे. लेणीसमोर बांधीव तळे असून परिसरात देवकोष्टेही आढळतात. या सर्व घटकांमुळे ही रचना केवळ धार्मिकच नव्हे, तर स्थापत्यदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरत आहे. विशेष म्हणजे, या लेणीची रचना विदर्भातील भटाळा (जि. चंद्रपूर) येथील लेण्यांशी साधर्म्य दर्शवत असल्याने ती वाकाटककालीन असण्याची शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे, संशोधक विनोद पवार तसेच स्थानिक ग्रामस्थ प्रकाश जोग यांनी नुकतीच या ठिकाणी भेट देत सखोल पाहणी केली. एकाच खडकात कोरलेली गर्भगृहे, देवकोष्टे आणि तळ्याची रचना यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास करत प्राथमिक निरीक्षणे नोंदविली.

दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांकडून या ठिकाणी नियमित पूजा-अर्चा केली जात असली तरी या ऐतिहासिक ठेव्याचे शासकीय पातळीवर अद्याप जतन आणि संवर्धन झालेले नाही, ही खंत व्यक्त होत आहे. तेरवण येथील ‘रामलिंग’ लेणीचा शास्त्रीय आणि पुरातत्त्वीय दृष्टीने सखोल अभ्यास झाल्यास, कोकणच्या प्राचीन इतिहासातील अनेक अज्ञात पैलू उजेडात येण्याची शक्यता आहे.