राजापूर : वाढत्या तापमानाचा परिणाम नैसर्गिक जलस्रोतांवर दिसू लागला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबा धरणातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या घटला आहे. त्याचवेळी पर्यायी स्रोत असलेल्या शीळ जॅकवेलला वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेचा फटका बसत असल्याने राजापूर शहरात संभाव्य पाणीटंचाईचे संकेत मिळू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून नदी-नाले, झरे आटू लागले आहेत. भूजलपातळीही खालावत असल्याने पाणीउपलब्धतेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या सायबा धरणातील साठा कमी झाल्याने पाणीपुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, शीळ जॅकवेलमार्फत होणाऱ्या पाणीउचल प्रक्रियेला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अडथळे येत आहेत. परिणामी, शहरातील पाणी साठवण टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जात नसल्याने कमी दाबाने व अनियमित वेळेत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीचा विचार करून नगरपालिका प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईसाठी नियोजन सुरू केले असून नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नळजोडण्यांवर बेकायदेशीर पंप लावू नयेत, अन्यथा संबंधित जोडण्या कायमस्वरूपी बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सायबा धरणातील घटलेला साठा लक्षात घेता देखभाल व दुरुस्ती कामांसाठी दर शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली आहे
