गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर सांगली बाजारात राजापुरी हळदीला क्विंटलला 11 हजार 500 रूपये दर मिळाला. यंदाच्या हंगामातील हळदीचे सौदे आजपासून सुरू झाले असून मुहुर्ताचा सौदा पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते काढण्यात आला.
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर नवीन हळदीचे सौदे काढण्याचा प्रघात असून आज अधिक्षक तेली यांच्या हस्ते मे. बी. बी.यलीगार या दुकानात सौदा काढण्यात आला. यावेळी कर्नाटकातील हिडकल ता. रायबाग येथील शेतकरी पिराप्पा चनाप्पा व्हसट्टी यांच्या हळदीला 11 हजार 500 रूपये प्रतिर्क्विटल असा दर मिळाला. यु.के. खेमजी आणि कंपनीने ही हळद खरेदी केली.आज काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये कमाल साडेअकरा ते किमान साडेसहा हजार असा दर मिळाला. पहिल्याच दिवशी सरासरी हळदीचा क्विंटलचा दर साडेआठ हजार असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. यावेळी बाजार समितीचे प्रशासक उप निबंधक मंगेश सुरवसे यांनी अधिक्षक तेली यांचे स्वागत केले. यावेळी सचिव महेश चव्हाण, अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष सतिश पटेल, गोपाळ मर्दा, प्रशांत पाटील मजलेकर, आर.टी. कुंभार आदीसह व्यापारी, खरेदीदार शेतकरी उपस्थित होते.