मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब आणि त्यांच्या आईंसह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले. २० वर्षांनंतर राज ठाकरे आईंना घेऊन मातोश्रीवर आले, त्यांनी उद्धव ठाकरेंना भेट म्हणून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळशीचे रोप दिलं. ठाकरे बंधूंमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेत्यांकडून याला कौटुंबिक भेट म्हटले जात असले तरी, आगामी २०२५ च्या निवडणुका पाहता या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली ही सहावी भेट आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी कशा झाल्या वाचा सविस्तर
१) ५ जुलै २०२५ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या विजयी मेळाव्यात एकत्र आले. दोघांचीही भाषणं झाली. एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
२) २७ जुलै २०२५ : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
३) २७ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे गणपती दर्शनसाठी राज ठाकरेंच्या घरी सहकुटुंब भेटले. ज्यावेळी ठाकरे कुटुंबाचा स्नेहभोजन कार्यक्रम हा राज ठाकरेंच्या घरी म्हणजेच शिवतीर्थ या ठिकाणी पार पडला.
४) १० सप्टेंबर : उद्धव ठाकरे हे अनिल देसाई आणि संजय राऊत यांच्यासह राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. तिथे आपण मावशीशी चर्चा करायला गेलो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
५) ५ ऑक्टोबर : संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. त्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर पोहचले आणि त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेही पोहचले दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
६) १२ ऑक्टोबर : राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवसास्थानी त्यांच्या मातोश्रींसह आणि संपूर्ण कुटुंबासह पोहचले. ठाकरे कुटुंबांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
शिवरायांचा अश्वारुढ पुतळा आणि तुळस वृंदावनाची भेट
राज ठाकरे यांची मातोश्री भेट ही अत्यंत खास आहे. कारण राज ठाकरे पहिल्यांदाच त्यांच्या आईला घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. ‘मी माझ्या कुटुंबासह आलो आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. ही कौटुंबिक भेट आहे,’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. यावेळी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील मागच्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळस वृंदावन पाहायला मिळत होते. या दोन्ही गोष्टी त्यांनी उद्धव ठाकरेंना भेट म्हणून दिल्या.
राज ठाकरे त्यांच्या आईसह आणि संपूर्ण कुटुंबासह मातोश्रीवर
राज ठाकरे, त्यांच्या आई, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे, त्यांची सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे असं संपूर्ण कुटुंब उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी गेलं होतं. ही कौटुंबिक भेट असली तरीही यात राजकीय चर्चा झाली असण्याचा अंदाज आहेच. याबाबत संजय राऊत प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.
