MNS Former MLA Raju Patil Statement On Marathi Manoos: मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही मतदारांना मतदान केंद्रे सापडत नाहीत, तर काही मतदारांच्या ओळखपत्रांवर चुकीचा तपशील असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना कल्याण-डोंबिवलीच्या महानगरपालिका निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले, “गेले काही दिवस जे बघतोय त्यातून असे वाटते की, या सुसंस्कृत शहराची जी वाट लावलेली आहे, त्यामुळे शहराचे नाव देशभरात खराब झाले आहे. हे बघून कुठेतरी मनापासून वाईट वाटते. राजकारण होत राहील, मतदान होत राहील परंतु ही अशी परिस्थिती आमच्या शहरांची नव्हती. मला वाटते तोच राग इथले नागरिक, इथले भूमिपुत्र मतपेटीतून व्यक्त करतील आणि नक्कीच त्याचा परिणाम उद्या दिसेल.”
ठाकरे बंधू यांची युती आणि शहरातील त्यांच्या काही उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याच्या मुद्द्यावर राजू पाटील म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठा पक्ष आहे म्हणणाऱ्यांना लोकांची काय गरज आहे? यांनी पैसे देऊन लोक फोडले आहेत. पैशाचा, सत्तेचा जो गैरवापर सुरू आहे, त्याला काही आमचे गद्दार लोक बळी पडले आहेत. काळ त्यांना दाखवेल की त्यांचा निर्णय योग्य होता की नाही.
कल्याण-डोंबिवलीत मनसे कशी कामगिरी करेल याबाबत माजी आमदार राजू पाटील म्हणाले की, “जे झाले ते झाले, पिक्चर अभी बाकी हैं. हे शहर अजूनही आपले मराठीबहुल शहर आहे. मराठी माणूस आमचा नक्कीच विचार करेल, कारण त्यांना पुढचे भविष्य दिसत आहे. काही भाग असे आहेत जिथे मराठी माणसाची काय परिस्थिती झाली आहे हे मराठी माणूस जाणून आहे आणि नक्कीच ते त्यांची बुद्धी ठिकाणावर ठेवून यावेळी मतदान करतील. आम्हाला तर अशीच परिस्थिती दिसतेय.”

