अकोले : राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे अध्यक्ष, प्रमुख यांचे सगे-सोयरेच साखर व्यापारात असून, सद्यःस्थितीचा सर्वाधिक फायदा त्यांनाच होणार असल्याचा दावा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. साखर ही जीवनावश्यक बाब असल्यामुळे साखर कारखान्यांकडील साखरेच्या साठ्याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्या. गोदाम तपासणीत अतिरिक्त साखर सापडल्यास ती जप्त करा, तसेच कोणत्याही स्थितीत साखर आयात करू नका, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. या साखर समस्येमुळे ग्राहकांना २१ हजार कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्र सेवादलाच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांचा सन्मान सोहळा राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने शेट्टी अकोल्यात आले होते. तेव्हा ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते. देशात साखरेची टंचाई नाही, तरीही टंचाई असल्याची हवा तयार करण्यात आली. त्यामुळे साखरेचे भाव वाढले आहेत. हे सर्व व्यापारी लॉबीने ठरवून केले गेले आहे. देशात मागील गळीत हंगामात उत्पादन झालेली २९१ लाख टन साखर व आधीच्या वर्षाची शिल्लक ४७ लाख टन साखर, अशी ३३८ लाख टन साखर शिल्लक होती. यातील ८ लाख टन साखर निर्यात करण्यात आली. सप्टेंबरअखेरपर्यंत सरकारने २४७ लाख टन साखर विक्रीस परवानगी दिली आहे. म्हणजेच ऑगस्टअखेर ८३ लाख टन साखर शिल्लक असावयास पाहिजे होती.
मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या दाव्यानुसार फक्त ३५ लाख टन साखर शिल्लक आहे. मग ४८ लाख टन साखर गेली कुठे? ही साखर एकतर दाबून ठेवली असावी किंवा बांगलादेश, नेपाळमध्ये या साखरेची तस्करी झाली असावी, असा दावा त्यांनी केला. शेजारी देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात साखरेची तस्करी होत असेल, तर गृह खाते काय करीत होते, असा सवालही त्यांनी केला आहे. उत्तर भारतातील खासगी साखर कारखानदारांचा या सर्व प्रकरणात मोठा वाटा असून, हे कारखानदारच भाजपचे देणगीदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
साखर आयात करू नका, असे पत्र आपण महिनाभरापूर्वीच केंद्र सरकारला दिले होते. साखर आयातीचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही साखर देशात उपलब्ध होण्यासाठी ऑक्टोबर महिना उजाडेल. तोपर्यंत साखर कारखाने सुरू झाले असतील. त्यामुळे उपलब्धता वाढून साखरेचे भाव पडतील व त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या अध्यक्षांचे रक्ताचे नातेवाईकच मोठे साखर व्यापारी झाले आहेत. राजकारण्यांचा काळा पैसा साखर व्यापारात गुंतलेला आहे. कारखानदार, व्यापारी हेच या सर्व घोटाळ्याचे खरे लाभार्थी असणार आहेत.
एकेकाळी कारकुनाच्या हाताखाली काम करणारी व्यक्ती पंधरा वर्षांत २१ कारखान्यांची मालक कशी काय झाली? अब्जाधीश बनलेल्या संबंधित व्यक्तीला नेमका कोणाचा वरदहस्त आहे? या व्यक्तीच्या कंपनीला फायदा व्हावा, काळा पैसा पांढरा करून उसाला भाव देता यावा म्हणून तर भाववाढ झाली नाही ना, अशी शंका त्यांनी बोलून दाखवली. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांची गोदामे तपासून प्रत्यक्ष साठ्याचा पंचनामा करावा आणि कारखानानिहाय आकडेवारी जाहीर करावी. अन्यथा शेतकरी स्वतः कारखान्यांच्या कार्यस्थळावर जाऊन साखरेचे ऑडिट करतील, असा इशारा त्यांनी दिला.
