महाविकास आघाडीसोबत ताणलेल्या संबंधाचा शेवट करत मंगळवारी (५ एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. यानंतर राजू शेट्टी यांनी मोठं विधान केलंय. आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी यांनी आघाडीची आमदारकी देखील नको असल्याचं म्हणत महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून आपलं नाव वगळण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी भेटीसाठी राज्यपालांची वेळही मागितली आहे. राजू शेट्टी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी यांनी केंद्र शासनाबरोबर सहयोगी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे ते महाविकास आघाडीला राम राम करणार असल्याची चर्चाही रंगली होती. याबाबत त्यांना गेल्या महिन्यात पत्रकार परिषद विचारणा केली असता ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे; त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे आज राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शेतकरी प्रश्नी आंदोलन

सत्तेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तडजोड करीत असल्याच्या मुद्द्याचे राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात खंडन केले. ते म्हणाले, “केंद्रात भाजपा बरोबर सत्तेत असतानाही त्यांचे घोटाळे बाहेर काढले होते. महागाई, इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले होते. राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, परंतु ही आघाडी मित्रपक्षांना विचारत नाही. शेतकऱ्यांना दिवसा वीज, एफआरपीचे दोन तुकडे यासारख्या प्रश्नांविरोधात आवाज उठवूनही तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : राजू शेट्टी यांचा मोठा निर्णय, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर

यावेळी राजू शेट्टी यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभारले जाणार असल्याची घोषणा केली.