सावंतवाडी: नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून सुमारे ९० टक्के पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे सांगत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता आपल्या न्याय्य हक्कासाठी ‘आरपारची लढाई’ लढावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राजू शेट्टी म्हणाले की, विधानसभा अधिवेशनात प्रति हेक्टरी २२ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली. याचा हिशोब केल्यास एका कलमाला (झाडाला) केवळ २२० रुपये मिळतात. ज्या कलमावर शेतकरी ४५०० ते ५००० रुपये खर्च करतो, त्याला केवळ २२० रुपये नुकसानभरपाई देणे हा थट्टा करण्याचाच प्रकार आहे. काजू उत्पादकांना तर सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेट्टी यांनी सरकारच्या खर्चाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटी रुपये उधळण्यास सरकारकडे पैसे आहेत. २०१५ चा कुंभमेळा अडीच हजार कोटींमध्ये झाला होता, मात्र आता भ्रष्टाचारासाठी ही रक्कम वाढवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राला नको असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी ९५ हजार कोटी रुपये उधळायला सरकारकडे पैसे आहेत, मग शेतकऱ्यांसाठी तिजोरी रिकामी का?” असा सवाल त्यांनी केला.

चलो मुंबई’चा नारा:

कोकणातील शेतकऱ्यांनी केवळ आंब्याच्या उत्पादनातून शासनाला १३०० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळवून दिले आहे. तरीही संकटकाळी सरकार त्यांना मदत करत नाही. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे आणि मुख्यमंत्री यांना याची किंमत चुकवावी लागेल, असेही ते म्हणाले. कोकणातील बागायतदारांच्या मागण्यांसाठी लवकरच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एक भव्य मोर्चा मुंबईवर धडकणार असून लवकरच ‘चलो मुंबई’चा नारा दिला जाईल, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. यावेळी किरण टेंबुलकर, गणेश गावकर, गणेश वाळके आदि पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रास्ता रोको आंदोलकांवर गुन्हा दाखल:

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ मार्च रोजी मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या सह ३७ जणा विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ३७ जणासह एकूण ६० जणांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

मात्र या आंदोलनाला जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी भेट देऊन आश्वासन दिले तेव्हा रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी पोलीसांनी केसेस दाखल करू नये असे चर्चेत ठरले होते, असे आंदोलकांनी म्हटले आहे.