स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी ऊसाच्या एफआरपी प्रश्नावरून आक्रमक झालेत. यावरून त्यांनी एफआरपीचे तुकडे करण्याच्या निर्णयावरून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. तसेच अप्रत्यक्षरित्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधलाय. “सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार उघड उघड एकरकमी एफआरपी देणार आहे पण बाळासाहेब देऊ देत नाहीत, असं सांगतायेत. मग बाळासाहेब तुम्हालाच अडचण काय? थोरल्या साहेबांचा आदेश आला आहे काय?” असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.

राजू शेट्टी म्हणाले, “ऊस दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी उसाची एफआरपी १४ दिवसाच्या आत विनाकपात एकरकमी द्यावी असा कायदा आहे. असं असताना त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून एफआरपी वर्षभरामध्ये तुकड्या-तुकड्याने देण्याचा घाट केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घातलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याला विरोध केला असताना मोदींपासून पवारांपर्यंत सगळ्याच नेत्यांना एफआरपीचे तुकडे पाडण्याची घाई झालेली आहे. १९ ऑक्टोबरच्या जयसिंगपूर येथील २० व्या ऊस परिषदेमध्ये किमान लाखभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एक रकमी एफआरपी पाहिजे असा ठराव केलेला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील या ठरावाचा आदर करणार आहात की नाही?”

Nitesh Rane, T Raja
प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : त्रासाची जबाबदारी स्वीकारली नाही

“सहकार मंत्री असून तुम्हाला कळत नाही का?”

“जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत एफआरपी एक रकमी दिली पाहिजे हे सहकार मंत्री असून तुम्हाला कळत नाही का? सहकार मंत्री या नात्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे न्याय मिळवून देणं ही तुमची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. मात्र तुम्ही सहकारमंत्री असल्याचे विसरलात आणि सह्याद्रि कारखान्याचे चेअरमन या नात्याने तुम्ही ३ तुकड्यांमध्ये एफआरपी देण्याचं जाहीर सूतोवाच केलं. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा अधिकार तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा सहकार मंत्री पद सोडा,” अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

“थोरल्या साहेबांचा आदेश आला आहे काय?” राजू शेट्टींचा सहकार मंत्र्यांना सवाल

राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, “तुम्ही शपथ घेत असताना कायद्याप्रमाणे राज्य करण्याचे दिलेले वचन आणि घेतलेली शपथ विसरलात का? कर्नाटक सीमाभागातील ८ कोल्हापूर जिल्ह्यातील २४ सांगली जिल्ह्यातील ३ आणि सातारा जिल्ह्यातील २ साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच जवळपास ४०-४२ साखर कारखाने आज एक रकमी एफआरपी देणार आहेत. यंदा साखरेलाही चांगला भाव आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार उघड उघड म्हणतायेत आम्ही देणार आहे, पण बाळासाहेब देऊ देत नाहीत, मग बाळासाहेब तुम्हालाच अडचण काय? काय थोरल्या साहेबांचा आदेश आला आहे?”

हेही वाचा : राजू शेट्टींच्या आंदोलनाची सरकारकडून दखल!; पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर उद्या मुख्यमंत्र्यासोबत होणार बैठक

“‘तुम्हाला सहकार मंत्री केलेले आहे आता आमचं मुकाट्याने ऐका’, असं थोरले साहेब सांगत आहेत का? तुम्ही तुमच्या मुलाबाळांसहीत दिवाळी साजरी केली, पण शेतकऱ्यावर शिमगा करण्याची वेळ आली. ऐन दिवाळीत शेतकऱ्याची पोरं आंदोलन करत असताना तुम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. आज बलिप्रतिपदा आमच्या शेतकऱ्यांचा राजा “बळी“ त्याचा दिवस बटु वामनाने विश्वासघाताने बळीराजाला आज पाताळात गाडलं. त्यावेळेपासून आम्ही बळीच्या राज्याची वाट बघतोय आणि याच दिवशी तुम्ही मात्र कायदेशीररित्या उसाचा दर मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना पोलिसांकरवी भल्या पहाटे ताब्यात घेऊन त्यांना तुरुंगात डांबलं,” असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

“जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा”

“व्वाह बाळासाहेब चांगलच पांग फेडलं”. याच शेतकऱ्यांनी तुम्हाला मत देऊन अनेक वेळा आमदार केलं, मंत्री केलं त्याच्या उपकाराची अशी परतफेड कराल असं वाटलं नव्हतं. तुमच्या या कृत्यावरून तुम्ही बटु वामनाचेच वारसदार असल्याचेच सिद्ध केले आहे. ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्रामध्ये सहकार रुजवला आणि वाढवला त्यांचेच कट्टर अनुयायी तुमचे वडील पी डी पाटील या दोघांच्या आत्म्याला स्वर्गामध्ये किती यातना होत असतील? तुमच्या मनाला काहीच कसं वाटलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा आणि तुमच्या कारखान्याची एक रकमी एफआरपी जाहीर करा. ते जमत नसेल तर सहकार मंत्री पदाचा राजीनामा द्या आणि घरात बसा,” अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.