सावंतवाडी:हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही, शासनाने प्रतिझाड (प्रतिकलम) अवघी २२० रुपये नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. या अन्यायाविरोधात आणि देवगड येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आगामी ३ जुलै रोजी देवगड येथे ‘जलसमाधी’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोकणातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे.
राजू शेट्टी यांनी शासनाच्या धोरणांवर आणि प्रस्तावित प्रकल्पावर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी संकटात असून शासनाकडे मदतीची अपेक्षा करत आहेत. हवामान बदलामुळे यंदा आंब्याला फळधारणा झाली नाही आणि काजूचीही तीच स्थिती आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन निधीतून भरीव मदत देणे तसेच विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई देणे गरजेचे होते. मात्र, दोन्ही सरकारे आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही.
शेतकऱ्यांनी यापूर्वी मोर्चे, रास्ता रोको आणि मेळावे घेऊनही सरकार त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्यातच आता देवगड तालुक्यात अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. आधीच बिघडलेल्या पर्यावरणामुळे आंबा-काजूचे उत्पादन धोक्यात आले असताना, हा प्रकल्प आल्यास कोकणातील उरलेली बागायती पूर्णपणे नष्ट होईल. भातशेती आधीच संपली आहे, आता आंबा-काजूही नष्ट झाले तर कोकण हिरवेगार न राहता त्याचे ‘राजस्थान’ होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सरकारकडून न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट जलसमाधी घेण्याची टोकाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोकणची भूमी वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई आणि कोकणातील सर्व नागरिकांनी ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता देवगड येथील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
