सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांना अद्याप नुकसान भरपाई जाहीर न झाल्याने, येत्या सोमवार दि. २३ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यंदाच्या बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचे केवळ १० टक्के पीक शिल्लक राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा पिकाला हेक्टरी ५ लाख आणि काजू पिकाला ३ लाख रुपये भरपाई मिळावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी यापूर्वी वेंगुर्ले, देवगड येथे मेळावे आणि ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित असलेल्या पालकमंत्र्यांनी दोन दिवसांत भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज दहा दिवस उलटूनही सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
राज्याचे अधिवेशन २५ मार्च रोजी संपणार आहे, तरीही बागायतदारांच्या पदरी निराशाच आहे. “राज्य शासन आंबा-काजू बागायतदारांची घोर फसवणूक करत आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनांवर आता आमचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याशिवाय बागायतदारांकडे पर्याय उरलेला नाही,” असेही शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.
येत्या २३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजल्यापासून नांदगाव येथे हे आंदोलन सुरू होणार आहे. या पत्रकार परिषदेला कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, संजय नरे, संजय राऊत, गणेश वाळके, रामचंद्र लुडबे, रत्नाकर कोळंबकर, चंदू गावडे, सखाराम ठाकूर, चंदन मामघाडी, राहुल लुडबे, विलास लुडबे यांसह अनेक बागायतदार उपस्थित होते.
