सावंतवाडी: आंबा आणि काजू बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव तिठा येथे ‘चक्का जाम’ आंदोलन छेडण्यात आले. सकाळी ११:१० वाजल्यापासून शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडल्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
दहा दिवसांचा अल्टिमेटम संपला:
दहा दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला होता. आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख आणि काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते, मात्र दहा दिवस उलटूनही ठोस निर्णय न झाल्याने आज २३ मार्च रोजी पूर्वघोषित आंदोलनाचे पाऊल उचलण्यात आले.
राजकीय नेत्यांचा आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग:
या आंदोलनात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, आंबा उत्पादक संघाचे काका ढोके, उत्तम लोके, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, संदेश गावडे यांच्यासह शेकडो शेतकरी महामार्गावर उतरले आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून अनेक आंदोलकांना आगाऊ नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, या नोटिसांना न जुमानता शेतकऱ्यांनी आपला एल्गार पुकारला आहे. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही,” असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून तणावपूर्ण शांतता आहे.
