ऊसदराचा निर्णय झाला नसताना, साखर कारखान्यांना ऊस घालणा-या शेतक-यांवर कमालीची नाराजी व्यक्त करून, शोभेसाठी मिशा ठेवल्या असतील त्या काढा व टाळय़ा वाजवत नामर्दासारखे हिंडत फिरा, अशी बोचरी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. उसाचा दर ठरविल्याशिवाय एक कांडंही तोडू देऊ नका. बेलगाम वागणा-या कारखानदारांना अद्दल घडवायची असले तर ऊस उत्पादक शेतक-यांनी संघटित व्हावे. कराडच्या प्रीतिसंगमावरील आंदोलनाला बहुसंख्येने हजर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कठापूर येथे सभेमध्ये ते बोलत होते. सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील, शंकर शिंदे, उत्तमराव केंजळे, किरण केंजळे, अनिल केंजळे, बापू केंजळे, अनिल केंजळे, जीवन शिर्के, हणमंतराव जगदाळे, दीपक चव्हाण, नीलेश केंजळे, संजय भगत, तानाजी देशमुख, अर्जुन साळुंखे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले की, कुत्र्याचं शेपूट सरळ होईल मात्र, न्याय्य हक्कांसाठी शेतकरी बांधव कधी सरळ होणार नाही अशी परिस्थिती होती. आज मात्र, परिस्थिती बदलली आहे. स्वाभिमानी संघटनेच्या यशस्वी वाटचालीमुळे शेतकरी वर्ग संघटित झाला असून हीच एकजूट साखर सम्राट व राज्यकर्त्यांची पोटदुखी बनली आहे. भक्कम संघटनेमुळे राज्यकर्त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सहकारामध्ये ज्यांच्याकडे न्याय मागायचा त्यांच्याकडेच सत्ता व खुर्ची आहे. त्या जोरावर आंदोलनाचा रेटा मोडण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू आहे. आमच्याच घामाचा पैसा भिका-यासारखा मागावा लागतो ही शरमेची बाब आहे. तुम्ही स्वत: पिकवलेला ऊस तुमच्या शेतात ठेवता येत नाही. तथाकथित दादा-बाबा साहेबांनी फर्मान काढले की त्यांच्या दावणीला जाणा-या मूठभर स्वार्थी लोकांना लाज वाटायला पाहिजे अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
सदाभाऊ खोत म्हणाले, २८८ आमदार ४८ खासदार व मूठभर साखर सम्राट छत्रपतींचे नाव घेऊन हरहर गर्जना करतात. मात्र, त्यांनी दिलेल्या आदर्श प्रशासनाची गुरुकिल्ली मात्र स्वार्थापोटी सोईस्कर विसरून जातात.
झुंडशाहीच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लढाई आहे. कष्टाची घामाची साखर सम्राट व राज्यकर्त्यांना जाणीव नाही. मस्तवाल झुंडशाहीमुळे महाराष्ट्रात ७० हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या त्याचे खरे कारण शेतमालाला हमी भाव न मिळाल्याने त्यांच्यातील आर्थिक विषमता व असंतोष वाढला हेच कारण आहे. वाढत्या महागाईमध्ये शेती करणे, कुटुंब चालवणे जिकीरीचे झाले असून, समाजामध्ये राज्यकर्त्यांविरोधात असंतोषाची दाहकता दिससेंदिवस वाढत आहे. प्रास्ताविक अरविंद केंजळे यांनी केले.