राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र या कर्जमाफीची अंमलबजावणी होतानाचा कारभार भोंगळ आहे, अशी टीका स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.  महसूल मंत्री म्हणतात ७० लाख अर्ज आले, राज्य सरकार १ कोटी अर्ज आल्याचे सांगत आहे तर ऑनलाईन अर्ज ५३ लाख आल्याचे सांगितले जाते आहे.

अर्जांबाबतच्या आकड्यांमधील ही तफावत पाहता कर्जमाफी देण्याच्या प्रक्रियेत घोळ आहे असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. रविवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारची कर्जमाफीची अंमलबजावणी सदोष आहे त्यामुळे अनेक शेतकरी त्रासले आहेत. शेतकऱ्याला सुलभ होईल अशा रितीने कर्जमाफी झाली पाहिजे. मात्र कर्जमाफीची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचा कारभार अनागोंदी आहे अशी टीका राजू शेट्टींनी केली.

सध्या ज्याप्रकारे कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाते आहे ते पाहता ही कर्जमाफी ७ ते ८ हजार कोटींच्या वर जाईल की नाही याचीही शंका आहे. कर्जमाफी देताना ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या अटींमुळेच कोल्हापूर मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बेमुदत बंद पाडण्याचा इशारा दिला. मुश्रीफ यांची भूमिका योग्यच आहे असेही शेट्टी यांनी सांगितले.

दक्षिण भारतात झालेल्या शेतकरी मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भाषिक, प्रांतिक, धार्मिक आणि जातीय भेदाभेद बाजूला ठेवून शेतकरी एकत्र आला. शेतकऱ्यांची एकजूट किती मोठ्या प्रमाणात झाली आहे याची प्रचिती २० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात दिसून येईल असेही शेट्टी यांनी म्हटले.

सदाभाऊ खोत यांची खिल्ली
शेतकऱ्यांच्या नव्या संघटनेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भगदाड पडेल असे वक्तव्य मी ऐकले आणि घाबरून गेलो, असा खोचक टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोतांना लगावला. तसेच या संघटनेमुळे काहीही फरक पडत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.