ऊसदराच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर अटक करण्यात आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी तसेच सतीश काकडे यांचा जामीनअर्ज बारामतीच्या सत्र न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. मात्र, आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांनी इंदापूर, बारामती व दौंड तालुक्यात न जाण्याची, त्याचप्रमाणे प्रक्षोभक भाषण न करण्याची अट न्यायालयाने घातली आहे.
उसाला तीन हजार रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना अटक झाल्यानंतर आंदोलनाने िहसक स्वरूप धारण केले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर त्याचप्रमाणे पुणे जिल्हय़ातील इंदापूर, बारामती या भागात आंदोलनाचा भडका उडाला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सांगलीतील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे इंदापूरमध्ये ट्रकच्या टायरमधील हवा सोडत असताना टायर फुटून एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. आंदोलनाचा भडका उडाला असताना इंदापूर न्यायालयाने शेट्टी यांचा जामीन नामंजूर केला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी बारामती न्यायालयात जामीनअर्ज दाखल केला होता.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. हा लढा शेवटपर्यंत लढणार, असा
निर्धार  शेट्टी यांनी पुण्यात व्यक्त केला. ‘रास्ता रोको’ सोडून इतर मार्गाने आंदोलन सुरू ठेवले जाईल, असेही ते म्हणाले.     
‘शरद पवारांनी आकडेवारी घेऊन बोलावे’
शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, पवार हे अभ्यासू नेते आहेत. कोल्हापुरात किती कारखाने सुरू आहेत व किती गाळप झाले याची आकडेवारी घ्यावी व त्यानंतर त्यांनी बोलावे.