ऊसदर आंदोलनाच्या खटल्याचा निकाल

कराड : पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असल्याने सन २०१३ मध्ये ऊसदर आंदोलनाचे कराड हे केंद्र बनवून झालेल्या तीव्र आंदोलनाच्या खटल्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती दलाचे प्रमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत व बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील आदी शेतकरी नेत्यांसह कार्यकर्ते व गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांची कराड न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 

कराड तालुक्यातील पाचवडच्या स्मशानभूमीत ऊसदराच्या आंदोलनासाठी जागा देण्यात आल्याने मुळातच शेतकरी व शेतकरी नेते चिडले होते. अशातच शेतकऱ्यांचे प्रश्न व या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याच्या भावनेतून या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

‘रास्ता रोको’सह गावागावात बंद पाळला गेला. त्यात शेतकरी नेते व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. या खटल्याचा निकाल लागला असून, न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी खटल्यातील सर्वांची निर्दोष मुक्तता केली. हा खटला वकिलांनी कोणतेही शुल्क न घेता लढल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.