सर्वसामान्यांच्या हिताची असलेली महाराष्ट्रातील सहकार चळवळ पांढऱ्या कपडय़ातील राजकीय दरोडेखोरांनी उध्वस्त केली आहे. महाराष्ट्रातील ही चळवळ गुजरातप्रमाणे तरुण होण्याऐवजी सत्ताधारी पुढाऱ्यांनी वृध्दावस्थेत नेऊन पोहोचविली आहे. या चळवळीचे शुध्दीकरण करण्याची आवश्यकता आहे. यावर सांगोपांग विचार करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे  येत्या ९ ऑगस्टला पुण्यात सहकार बचाव परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात सहकार वाचविण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
येथील विश्राम भवनात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, दर्शक हाथी, गजानन अमदाबादकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महायुतीत विधानसभेच्या राज्यातील ६० जागांची मागणी केली आहे. विदर्भात संघटना ८ जागा लढविण्यास इच्छुक आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली व खामगाव या विधानसभेच्या जागा संघटनेला हव्या आहेत. तशी मागणी महायुतीकडे करण्यात आली आहे.
अतिवृष्टी, गारपीट व उशिरा पावसाळा सुरू झाल्याने विदर्भातील शेतकरी त्रस्त झाला आहे. या शेतकऱ्यांना संपूर्ण वीज माफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा. कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारने शेतकऱ्यांना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केल्याचा डंका वाजविला. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची फ सवणूक केली. या सरकारने केवळ ५२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी के ली. कर्जमाफीचे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना न देता त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. याच सरकारने मुठभर उद्योगपतींना २७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. याचवेळी कोटय़वधी शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी स्वामिनाथन समितीचा अहवाल लागू करण्याची आवश्यकता आहे. या अहवालानुसार उत्पादन खर्च अधिक ५० टक्के हमी भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे. हा अहवाल लागू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा बॅंक बुडविणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात आंदोलन सुरूच राहील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांना त्रास देणारे कॉंग्रेसचे चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी आवरावे.
अन्यथा, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. सत्तेची मस्ती आणि गुर्मी उतरविण्यासाठी स्वाभिमानी तयार असल्याचा इशारा त्यांनी दिला. खामगाव-जालना या प्रलंबित मार्गासाठी स्वाभिमानीचे व जिल्ह्य़ातील नेत्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना भेटेल, असेही त्यांनी सांगितले.