राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने सहावा उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला धक्का दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र दिसत आहे. या निवडणुकीचे निकाल शनिवारी पहाटेच्या सुमारास झाहीर झाल्यानंतर राज्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. अशातच आता शिवसेनेने या निकालावरुन राज्यातील सरकार अस्थिर होईल असा समज करुन घेऊ नये असं विरोधीपक्षाचा थेट उल्लेख न करता म्हटलंय. तसेच या निकालाच्या निमित्ताने विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भातही शिवसेनेनं भाष्य केलंय.

“राज्यसभा निवडणुकीत भाजपाने सहावी जागा जिंकली आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सरकारच्या तंबूत घबराट पसरली, असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. अपक्ष व छोट्या पक्षांच्या मदतीनेच सहावी जागा जिंकावी ही योजना जशी महाविकास आघाडीची होती तशीच भारतीय जनता पक्षाची होती. राजकारणात हे व्हायचेच. चार-पाच अपक्ष व वसई-विरारच्या बहुजन विकास आघाडीवाल्यांचे गणित भाजपाच्या बाजूने गेले व त्यांचे उमेदवार निसटत्या फरकाने जिंकले. अर्थात जो जिता वोही सिकंदर या न्यायाने सिकंदरांचा जल्लोष व उत्सव सुरू आहे. जणू काही फार मोठा चमत्कारच घडवला आहे, अशा पद्धतीचे अंगारे-धुपारे फिरवले जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले नाहीत व फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? मुंगीने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात, एवढ्यापुरतेच या निकालाचे महत्त्व आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

“या जुगाडबाजीच्या गणितात महाविकास आघाडीस अपयश आले म्हणून जगबुडी तर झाली नाही ना? एक साधा विषय समजून घेतला पाहिजे, महाविकास आघाडीकडे सत्तास्थापनेच्या वेळी १७० आमदारांचे बळ होते. विधानसभा अध्यक्षांना थेट मतदानात भाग घेता येत नसल्याने हा आकडा १६९ वर येतो. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने १६१ आमदारांनी मतदान केले. नवाब मलिक, अनिल देशमुख व ज्यांचे मत ‘बाद’ करायला लावले ते सुहास कांदे पकडले तर आकडा होतोय १६४. शिवसेनेचे एक आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. पंढरपूरची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने गमावली. हा सर्व हिशेब केला तर आजही आमदारांची संख्या ६६ इतकी आहे. म्हणजे विश्वासदर्शक ठरावापेक्षा संख्या तीननेच कमी आहे. या तीन मतांपैकी अपक्षांची दोन मते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी महाविकास आघाडीबरोबर नव्हती. त्यामुळे सहाव्या जागेच्या विजयाने महाराष्ट्रात मुंगीने मेरू पर्वत गिळला हो, अशी जी हाकाटी सुरू आहे त्यात दम नाही,” असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद करण्यात आले. हे एक गौडबंगालच आहे, पण त्याच पद्धतीचा आक्षेप सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदान प्रक्रियेवर घेण्यात आला. निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे आमच्या निवडणूक आयोगाचे ‘स्वतंत्र’ व ‘निष्पक्ष’ वर्तन मानायचे काय? खरे तर राज्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेतील सर्व आक्षेप फेटाळले. हा त्यांचा अधिकार असतानाही त्या अधिकारावर दिल्लीतून अतिक्रमण झाले. विधिमंडळातील कोणत्या चेंबर्समधून दिल्लीत हॉटलाइन सुरू होत्या व त्याबरहुकूम काय घडविण्यात आले त्याचा स्फोट झाला तर देशातील लोकशाही व निवडणूक पद्धतीचा मुखवटा जगासमोर गळून पडेल. राज्यसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया तांत्रिक व किचकट आहे हे खरे असले तरी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांची मते पक्की राहिली. त्यामुळे या सहाव्या जागेच्या निमित्ताने कुणी शहाणे राज्यातील सरकार अस्थिर होण्याची स्वप्ने पाहत असतील तर ते मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे व भक्कम राहील,” असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे.

“सहाव्या जागेच्या विजयासाठी फडणवीस यांचे चातुर्य व सूक्ष्म नियोजन कामी आले ते खरे असेलही. त्यांनी ज्या पद्धतीने मतांचे नियोजन केले त्यामुळे दुसऱ्या फेरीत सहाव्या उमेदवाराची मतसंख्या वाढली हे खरे असले तरी यात राजकीय भाग्याचेही महत्त्व आहे. पहिल्या पसंतीची ३३ मते शिवसेना उमेदवार संजय पवारांना तर २७ मते धनंजय महाडिकांना होती. तरीही पवार हरले. अशी गणिते इतर राज्यांतही मांडण्यात आली. हरयाणातही महाराष्ट्राप्रमाणे खेळ झाल्याने काँग्रेसचे अजय माकन हे ‘पाव’ मताने हरले. त्यांचा पराभवही संशयाच्या भोवऱ्यात आहे. माकन यांना तर आधी विजयी घोषित केले होते. राज्यसभेचे मतदान राजकीय पक्षांसाठी खुल्या पद्धतीने होते. घोडेबाजार होऊ नये म्हणून ही पद्धत आणली तरीही घोडेबाजार व्हायचा तो होतोच,” असा उल्लेख अग्रलेखात आहे.

“आता राज्यात विधान परिषदेची निवडणूक होईल व ते मतदान गुप्त पद्धतीने असल्याने अनेकांच्या आशा-आकांक्षांना नवे कोंब फुटले आहेत. अशा निवडणुकांत ‘आमदार’रूपी माणसे गोळा करणे, त्यांना सांभाळणे, टिकवणे हे लोकशाही पद्धतीत दिव्य होऊन बसले आहे. ज्यांच्या हाती ससा तो पारधी असा प्रकार त्यातूनच होतो. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर अशा पद्धतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी केला जावा हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. राज्यसभेची सहावी जागा भाजपाने जिंकून दाखवली याबद्दल त्यांचे अभिनंदन! पण त्यामुळे आकाश कोसळले काय? मुंगीने मेरू पर्वत गिळला काय? छे, छे! असे अजिबात झाले नाही,” असा उल्लेख लेखाच्या शेवटी आहे.