Raksha Khadse Muktai Nagar Panchayat Election Loss: मुक्ताई नगर पंचायतीच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुक्ताई नगरमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या २ हजारहून अधिक मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाला आहे. दरम्यान, रक्षा खडसे यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
“आज मुक्ताई नगरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत जनतेने शिवसेना शिंदे गटाला कौल दिला आहे. हा कौल मला मान्य आहे. या निवडणुकीची जबाबदारी मी घेतली होती. त्यामुळे नक्कीच पराभवाची जबाबदारीसुद्धा मी घेते. भाजपा म्हणून मला इथे लढणे हे महत्त्वाचे होते. कारण आज मी इथली खासदार आहे, मंत्री आहे. भाजपाचे संघटन इथे जिवंत ठेवणे गरजेचे होते”, असे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले.
यावेळी रक्षा खडसे यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, “मधल्या काळामध्ये काही लोकांनी इथे दबावतंत्राचा वापर केलेला होता. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्या विरोधात होती. मी आधीही सांगितलेले आहे की, ज्या पद्धतीने इथल्या आमदारांचा कारभार, दडपशाही आणि गुंडशाही आहे, आजही त्या मतांवर मी ठाम आहे.”
“मी अपेक्षा करते की, पुढे अशा गोष्टी होणार नाहीत. इथे लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी काम करावे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. याचबरोबर मी मुक्ताईनगरच्या जनतेचेही आभार मानते. आज भाजपाचे १७ पैकी चार सदस्य निवडून आले आहेत. यापूर्वी इथे काहीच नव्हते. पण निदान आज आम्ही इथे सुरुवात केली आहे आणि भविष्यामध्ये अजून जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न करू. जनतेचा विश्वास अजून आमच्यावर कसा वाढेल आणि संघटन अजून कसे मजबूत होईल, यासाठी मी प्रयत्न करेन”, असे रक्षा खडसे यांनी नमूद केले.
