पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी दुपारी येथील तपोवन मदानावर जाहीर सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी शहरात प्रथमच येणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच सभा असल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. सभेची जय्यत तयारी झाली असून ही सभा विक्रमी होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पंतप्रधानांची सभा असल्याने कडेकोट पोलिस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे. बाहेरील पोलिसही मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांच्या वक्तृत्वाची प्रचिती आली होती. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या सभांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बर उमेदवारांना पराभवाला तोंड द्यावे लागले होते. आता मोदी पंतप्रधान झाले असल्याने त्यांचे वलय वाढीस लागले आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांच्या वक्तृत्व गुणाचा प्रत्यय आला होता. त्यामुळे मोदी यांचे भाषण ऐकण्याचे औत्सुक्य जिल्ह्यात सर्वानाच लागले आहे. राजकीय घडामोडींबाबत ते कोणते विधान करणार याकडे सत्ताधारी व विरोधक अशा दोघांत कुतूहल निर्माण झाले आहे. विशेषत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते कोणते वक्तव्य करणार हे लक्षवेधी ठरले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही भाजपाला राजकीय फायदा व्हावा या दृष्टीने पक्षाच्या स्थानिक नेतृत्वांनी व्यूहरचना केली आहे. काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल यांना भाजपाच्या तंबूत आणून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. मोदी यांच्या सभेचा फायदा अमल महाडिक यांना व्हावा असा भाजपाचा दृष्टिकोन आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा होणार असल्याने जिल्हा व पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मोदी यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरविण्यात आलेले आहे. शहरातील पोलिस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्याबाहेरील पोलिसांच्या तीन कंपन्या शहरात दाखल झाल्या आहेत. स्थानिकांपेक्षा बाहेरच्या पोलिसांवरच बंदोबस्ताची अधिक जबाबदारी असल्याचे दिसत आहे.
आज सांगलीतही सभा
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आणि मोहरा म्हणून ओळख असणाऱ्या आर. आर. पाटील यांना पराभूत करण्यासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी तासगाव येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. सनिक शाळेच्या मदानावर सकाळी ११ वाजता ही सभा होणार असून या सभेसाठी जिल्ह्यातून कार्यकत्रे येतील, असा विश्वास खा. संजयकाका पाटील व पक्षाचे सहसमन्वयक मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.