कर्जत : नगरपंचायतमध्ये बंडखोर गटनेते संतोष मेहत्रे यांची आज, सोमवारी उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची सत्ता जाऊन भाजप नेते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ता आली आहे. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.
उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक आज होती. सकाळी ११ ते १ दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. बंडखोर गटाकडून गटनेते संतोष मेहत्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. रोहित पवार गटाकडून कोणीही उमेदवारी दाखल केली नाही. दुपारी दोन वाजता पीठासन अधिकारी नितीन पाटील यांनी संतोष मेहत्रे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, सतीश पाटील, छाया शेलार, माया दळवी, तारा कुलथे, ज्योती शेळके, लंका खरात, मोहिनी पिसाळ, सुवर्णा सुपेकर, मोनाली तोटे सभागृहात उपस्थित होते.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सभापती राम शिंदे यांनी सत्कार केला. त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली व गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले. पत्रकारांशी बोलताना राम शिंदे म्हणाले, कर्जतची निवडणूक राज्यात गाजत आहे. अनेक घटनाक्रम या तीन वर्षांत घडले. नगरसेवकांचा ताळमेळ घालण्यात, त्यांच्यात संवाद ठेवण्यात व त्यांना एकत्र ठेवण्यात रोहित पवार अपयशी ठरले. त्यामुळे नगरसेवकांनी उठाव केला.
लोकशाहीमध्ये बहुमत असूनही अविश्वासाची तरतूद नव्हती. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने नवीन अध्यादेश जारी करत अविश्वासाची तरतूद केली. त्याला न्यायालयातून अनेकवेळा विविध याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले. मात्र न्यायालयाने चारवेळा याचिका फेटाळल्या. अखेर नगरपंचायतमध्ये सत्ता परिवर्तन झाले. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा अनेक लोक आपल्याला का सोडून जात आहेत यावर रोहित पवार यांनी चिंतन करावे. गेल्या तीन वर्षात कर्जत शहरात नागरिकांना जो त्रास झाला व विकास थांबला तो आता गतीने सुरू होईल. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक अजूनही त्यांच्याच पक्षात असल्याचे राम शिंदे यांनी नमूद केले.
शहर विकासाला प्राधान्य
गेल्या दीड महिन्यापासून संघर्ष सुरू होता. जिल्हाधिकारी व न्यायालयात याचिका दाखल होत्या. मात्र माझ्यासोबत नगरसेवक ठाम होते. सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पुढील काळात शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येईल.-संतोष मेहत्रे, उपनगराध्यक्ष
खास सत्कारासाठी
उपनगराध्यक्ष निवडीसाठी व सत्कारासाठी सभापती राम शिंदे आवर्जून उपस्थित होते. त्यासाठी ते खासगी विमानाने मुंबईतून बारामती व बारामतीतून कर्जतमध्ये दाखल झाले. मुंबईमध्ये विषय समित्यांच्या निवडीसाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती, मात्र राम शिंदे त्याकडे पाठ फिरवत कर्जतमध्ये उपस्थित राहिले.