गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीच्या प्रश्नावरून आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. रोहित पवारांनी एमडीसीच्या प्रश्नासाठी विधिमंडळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं होतं. पण, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठकीचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. बुधवारी ( २६ जुलै ) उद्योगमंत्री बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, भाजपा आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांना सवाल विचारला आहे.
“जामखेडमध्ये २५ वर्षापूर्वी झालेल्या एमआयडीसीचं काय केलं?”, असा प्रश्न राम शिंदे यांनी रोहित पवार यांना विचारला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा : दोन भाऊ एकत्र येणार का? राज ठाकरेंबरोबरच्या युतीवर उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले….
राम शिंदे म्हणाले, “२५ वर्षापासून जामखेडला एमआयडीसी मंजूर आहे. तर, कर्जतला एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी २००९ पासून मी प्रयत्न करत आहे. मग, जामखेडला २५ वर्षापूर्वी झालेल्या एमआयडीसीची काय स्थिती आहे? कर्जतची एमआयडीसी कधी मंजूर होणार? असे प्रश्न उद्योगमंत्र्यांना विचारणार आहे.”
“पण, आपल्याला काही करता आलं नाही, म्हणून दुसऱ्यांवर चिखलफेक करणं योग्य नाही. समांतर प्रयत्न करा. कारण, विकास करण्याचा दृष्टीकोण तुमच्याबरोबर आमचाही आहे,” असा सल्ला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना दिला आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाची काव्यमय टीका; म्हणाले, “वजीर देतो शिव्या…”
“गेल्या ४ वर्षापासून रोहित पवार आमदार आहेत. मग, जामखेडला २५ वर्षापूर्वी सुरु झालेल्या एमआयडीसीचं काय केलं? आपल्याला जमत नसल्यानंतर दुसऱ्यांवर चिखलफेक करून काहीही साध्य होत नाही,” असा टोलाही राम शिंदे यांनी रोहित पवार यांना लगावला आहे.
