कर्जत : जिल्हा सहकारी बँक ही आशिया खंडातील क्रमांक एकची बँक आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी बँक निवडणूक बिनविरोध करण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यामुळे बिनविरोधचे वारे वाहत आहेत. मात्र, जर कोणी आत्मकेंद्री आणि स्वतःचाच विचार करून राजकारण करत असेल तर मात्र जिल्हा बँक बिनविरोध होणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंत्री विखे यांचे नाव न घेता दिला आहे.

तालुक्यातील निमगाव डाकू येथील धकोजी महाराज माध्यमिक विद्यालयामध्ये आज पंडित दीनदयाल स्पर्श योजनेचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. भाजपचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्या विशेष पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, नगराध्यक्ष छाया सुनील शेलार, अशोक खेडकर, गटनेते प्रा. सतीश पाटील, सुनील यादव, शेखर खरमरे, रमेश अनभूले, राजेंद्र भोसले, स्वप्निल तोरडमल उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, भारतीय डाक विभाग विश्वासार्ह आहे. यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या स्वतःच्या ठेवी सुरक्षित राहतील. डाक विभागाच्या अनेक योजनांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्नेहालय अंतर्गत असलेल्या कर्जत येथील अनाथ आश्रमातील मुलांना ११,००० रुपयांची देणगी देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

प्रास्ताविक नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांनी केले. जिल्हा डाक अधिकारी पालवे यांनी उपस्थित नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना पोस्ट विभागाच्या तसेच कृषी विभागाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन दादा शिंदे यांनी केले तर आभार कयूम मोमीन यांनी मानले.