अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आज, रविवारी अचानकपणे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अखेरच्या क्षणी घुमजाव करत, उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले. राम शिंदे चार दिवसांपूर्वीच बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी अर्ज निवडणूक कार्यालयातून घेऊन गेले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता.
बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी राम शिंदे गेल्या महिनाभरापासून सहकारातील अनेक मातब्बरांच्या गाठीभेटी घेत फिरत होते व वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या विरोधातील अनेकांना त्यांचा आधार मिळेल, अशी अशा वाटत हो.ती मात्र त्यांनी घुमजाव केल्याने इच्छुकांची निराशा झाली. राम शिंदे यांनी निवडणुकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रस दाखवण्यास सुरुवात केल्यामुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याशी त्यांचे खटके उडण्यास सुरुवात झाली होती. असे असतानाच राम शिंदे यांनी उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याने पालकमंत्री विखे गटाला काही साथ दिलासा मिळाल्याचे मानले जाते. मात्र असे असले तरी विखे यांनी वरिष्ठ पातळीवरून केलेल्या प्रयत्नातूनच शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू होती.
आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता किंवा व्यक्तिगत कारणामुळे उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला घेतलेला नाही तर विधान परिषदेच्या सभापती पदाचा मानसन्मान व प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण अंतरात्म्याचा आवाज ऐकून अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला.
मला तीन अपत्य असल्याबद्दल मला उमेदवारी दाखल करता येणार नाही, असे अनेकजण मत व्यक्त करत होते. मात्र मलाही कायद्याची जाणीव आहे आणि मी घेतलेल्या माहितीनुसार मला उमेदवारी अर्ज दाखल करता येतो, आमदार रोहित पवार यांनी याबद्दल हरकत घेतली मात्र त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये काय उद्योग केले, न्यायालयात प्रकरण गेले, अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. अनेकजण दहा वर्षापेक्षा अधिककाळ संचालक राहिले, चंद्रशेखर घुले, सिताराम गायकर, अंबादास पिसाळ हे त्यापैकी आहेत. परंतु केवळ माझ्याच उमेदवारीबद्दल चर्चा केली जात होती, मीडिया ट्रायल घेतली जात होती. परंतु सहकार कायद्यातील तरतुदीनुसार मला उमेदवारी दाखल करता येत होती. परंतु मी उमेदवारी अर्ज घेऊन नेला, छाननी होणे बाकी असतानाच माझ्याबद्दल चर्चा केली जात होती, असाही आक्षेप राम शिंदे यांनी व्यक्त केला.
एकाचवेळी दोन मतदारसंघातून एकाच नावाचा ठराव होणारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील माझा एकमेव इतिहास आहे, असाही दावा राम शिंदे यांनी केला.
जिल्हा बँकेच्या संचालक पदाची ज्यांना स्वप्न पडत होती, त्यांचे उमेदवारी अर्ज कसे राहतात हे मी पाहणार आहे. असा इशारा देतानाच राम शिंदे म्हणाले मी जरी निवडणुकीतील माघार घेतली असली तरी माझ्या समर्थकांसाठी पूर्ण पाठिंबा असणार आहे.
