“ त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला… ” ; केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करून केलं आहे विधान; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्त सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आज बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपा आणि आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन व्हावे, अशी मनोकामना देखील व्यक्त केली.

“शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल ; त्यासाठी शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे.” असं रामदास आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.

या अगोदर देखील अनेकदा रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपाने पुन्हा युती करावी असं बोलून दाखवलेलं आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन करावं, अजूनही वेळ गेली नाही, असंही त्यांनी या अगोदर बोलून दाखवलेलं आहे.

“ आमचे हिंदुत्व शेंडीजानव्याचे नाही असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी आहे हे अमरावतीत सिध्द झाले ”

तसेच, रामदास आठवले यांनी या अगोदर शिवसेनेचं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार? यावर भाकीत देखील केलेलं आहे. महाविकास आघडीच्या सरकारमध्ये सातत्याने भांडण असतात. त्यामुळे हे सरकार किती वर्ष टीकेल हे काही सांगता येत नाही. यांना एकत्र राहायचं असेल तर यांनी एकमेकांमध्ये कोपरखळ्या मारण्याचं थांबवल पाहीजे, असे आठवले म्हणाले होते. तसेच शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकारायचं असेल आणि आपले मतदार जपायचे असतील, तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, तेव्हाच शिवसेना टिकेल. नाहीतर शिवसेनेचं २०२४ मध्ये खूप मोठं नुकसान होईल. असे रामदास आठवले म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ramdas athavales big statement regarding bjp shiv sena alliance msr