राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात भाजपाचे तीन तर तीन महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांचा विजय झाला. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत संजय पवार यांचा पराभव झाला. दरम्यान, या निकालानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे, असं आठवले म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी अब्दुल सत्तारांनी मदत केली”; भाजपा आमदाराच्या दाव्याने खळबळ

‘राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे. निवडणूक कशी जिंकायची ती फडणवीस यांनी शिकविली आहे. फडणवीस यांनी तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे,’ असे म्हणत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचलं आहे.

हेही वाचा >>> ‘अब देवेंद्र अकेला नही है’ म्हणत अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाल्या…

दरम्यान, राज्यसभेसाठीची सहावी जागा भाजपा आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या सहाव्या जागेसाठी भाजपाने धनंजय माहडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हीच जिंकू असा दावा भाजपा आणि महाविकास आघाडीकडून केला जात होता. प्रत्यक्षात मात्र या जागेवर भाजपाचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. छोटे पक्ष तसेच अपक्ष आमदारांनी महाडिक यांना मतदान केले. महाडिक यांना ४१ मते मिळाली तर संजय पवार यांना ३३ मते मिळाली.

हेही वाचा >>> Weather Forecast : मुंबईत मान्सूनचे आगमन, ठाण्यापासून पुण्यापर्यंत पावसाच्या सरी; जाणून घ्या हवामान विभागाचा ताजा अंदाज

निवडणुकीत कोणाचा विजय? कोण पराभूत?

भाजपाने या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांना तिकिटे दिली होती. भाजपातर्फे पीयुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंय महाडिक यांचा विजय झाला. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा विजय झाला. शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले.