राहाता: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघातामध्ये घातपाताची शक्यता नसली तरी या घटनेची निःपक्षपाती चौकशी करून दोषींना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली.

आठवले यांनी आज, रविवारी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याची माझी खूप इच्छा होती. परंतु आता मी राज्याचा खासदार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांमुळे ही संधी मला मिळाली. अशी संधी मिळणारा मी एकमेव खासदार आहे. एकेकाळी आमचे ९ खासदार होते. सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे.

विमान अपघातसंदर्भात बोलताना आठवले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सावध भूमिका घेतली. एखाद्या कार्यक्रमाला किंवा लग्नसमारंभाला उपस्थित राहिल्यामुळे कोणावरही थेट आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र संबंधित विमान कंपनी, उड्डाणाची परवानगी आणि तांत्रिक बाबींची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. प्रफुल पटेल नागरी उड्डाण मंत्री होते. त्यामुळे ‘व्हीएसआर’च्या मालकांशी त्यांचे चांगले संबंध असतील. मात्र अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. अजित पवारांचा घातपात झाला असे मला वाटत नाही. कारण अजित पवार हे सर्व पक्षांमध्ये मित्रत्वाचे संबंध ठेवणारे नेते होते. त्यांचे कोणाशीही वैर नव्हते. त्यामुळे या घटनेत घातपात असल्याची शक्यता वाटत नाही. मात्र ही घटना अत्यंत दुर्दैवी असून नेमके कारण समोर यावे यासाठी निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विमान उड्डाणासाठी योग्य परिस्थिती नसताना परवानगी का देण्यात आली, लँडिंगसाठी अडचण असताना विमान दुसऱ्या विमानतळावर वळवले का गेले नाही, तसेच पायलट किंवा यंत्रणेमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, याचा तपास झाला पाहिजे. दोषींना कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आणखी दोन राज्यात संधी मिळाली तर माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. असे आठवले यांनी सांगितले. पुण्यात आमचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर घेतले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राज्यसभेसाठी अनेक नावे होते परंतु त्यांची अडचण झाल्याने त्यांनी ज्योती वाघमारेंच्या रूपाने एक महिला चेहरा दिला. त्या देखील दलीत पँथरच्या कार्यकर्त्या होत्या. राहुल गांधींनी आजतागायत जातीजातीत भांडणे लावण्याचे काम केले. राहुल गांधी आताही तेच काम करीत आहेत. इराण-अमेरिका युद्धाबाबत आठवले म्हणाले, अमेरिका आणि रशियासोबत आपले संबंध चांगले असल्याने नवीन करारामुळे छोट्या व्यापाऱ्यांना मोठी संधी मिळेल.