पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आजही कायम आहे, मोदी कधीच  दलित विरोधी नाहीत,  खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी  दिली नाही तर त्यांना रिपाइंचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी घेऊ असे  प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सातारा येथे केले.

ते म्हणाले की, देशात मोदींची हवा आहे. मोदी प्रामाणिक आहेत. त्यांनी भरपूर कामे केली असून ते दलितविरोधी अजिबात नाही. भाजपमध्ये अनेक बहुजन काम करत आहेत. २०१९ ला केंद्रात सरकार भाजपचेच येणार आहे. फक्त  काही जागा कमी जास्त होतील.

राज ठाकरे टीकेशिवाय दुसरं काय करणार असे सांगतानाच ते जेवढी जास्त टीका करतील, तेवढय़ा आमच्या जास्त जागा निवडून येतील, शिवाय जे सत्तेत नसतात त्यांनी टीकाच करायची असते, असा टोला लावत सरकारच्या चांगल्या कामाचे कौतुकही करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मी लोकसभेचा उमेदवार असून शिर्डी, रामटेक किंवा मध्य मुंबईतून उभा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा तेलुगू देसमचा निर्णय घाईघाईचा आहे. केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला वेगळे राज्य झाल्यापासून साडेबाराशे कोटी दिलेले आहेत. आंध्र प्रदेश सरकारला वेगवेगळया योजनांचे  प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारला सर्व राज्यांच्या गरजा समजून घेऊन निर्णय घ्यावा लागतो असे सांगून ते म्हणाले की,  महाराष्ट्रात भाजपने सेनेबरोबर रहावे. उद्धव ठाकरेंनी आपल्या भूमिकेत बदल करावा. वेगळे  लढल्यास भाजपापेक्षा शिवसेनेचे नुकसान जास्त होईल. काही झाले तरी आरपीआय शिवसेनेबरोबर न जाता भाजपबरोबर जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात, देशात पुतळ्यांना संरक्षण द्यावे, विटंबना, मोडतोड  करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे ते म्हणाले.

भीमा कोरेगाव प्रकरणात समाजच आंदोलनात उतरला होता. समाजाच्या आंदोलनात आमच्या पक्षाचे कार्यकर्तेही सामील झाले होते. ही प्रकाश आंबेडकर यांची एकटय़ाची लढाई नव्हती. गुन्हे दाखल झाले त्याच्यात  दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते  आणि समाजबांधव आहेत. या आंदोलनात मराठा समाजावर कोणताही  राग नव्हता. गावागावात  मराठा व दलित समाज गुण्यागोविंदाने राहतात व काम करतात. या आंदोलनात मोटार गाडय़ांचे सर्वात जास्त नुकसान झाले.

‘उदयनराजे आले तर त्यांचे पक्षात स्वागतच आहे. उदयनराजे सक्षम नेते आहेत. तसेच ते माझे चांगले मित्र आहेत.’ मराठा नेता म्हणून रिपाइंमध्ये त्यांनी यावे तसेच नारायण राणेंनी रिपाइंमध्ये यायला काय हरकत नाही. हे दोन्ही नेते जर रिपाइंमध्ये आले तर राज्याच्या राजकारणात भारिपचा दबदबा व पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भारिप जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, किशोर तपासे, दादा ओव्हाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.