केंद्रीय मंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्यानंतर त्यांना चिंता करण्याची आवश्यकता अजिबात नाही, असं मत व्यक्त केलं. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवले म्हणाले, “मोदींविरोधात एक चेहरा चालणार नाही. त्यासाठी शेकडो चेहरे लागतील. त्यामुळे अनेक चेहरे आले तरी मोदींना फरक पडणार नाही. मोदींचा चेहरा इतका मजबूत आहे की तिथं दुसरे चेहरे चालणारच नाही. नितीशकुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार असे अनेक चेहरे मोदींसमोर असले तरी त्याला घाबरण्याचं कारण नाही.”

“मी मोदींच्या पाठीशी असल्यानंतर त्यांना चिंता करण्याची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळे असे कितीही चेहरे आले तरी फरक पडणार नाही. २०२४ मध्ये आम्ही ४०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येऊ,” असा दावा रामदास आठवलेंनी केला.

“आमच्या पक्षातही फूट पडली होती”

रामदास आठवले पुढे म्हणाले, “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. लवकरच याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे निकाल पाहिले तसेच दिसतात. आमच्या पक्षात एकदा फूट पडली होती. आर. एस. गवई, जोगेंद्र कवाडे आणि मी असे तिघेजण एकत्र होतो. त्यावेळी कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून आमच्यात वाद झाला. मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो आणि गवई व कवाडे काँग्रेससोबत गेले.”

“माझ्या बाजूने संपूर्ण पक्ष होता, तरी चिन्ह मिळालं नाही”

“आमचा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. त्यावेळी दोन खासदार गवईंच्या बाजूने असल्याने आमच्या पक्षाचं ‘उगवता सूर्य’ चिन्ह गवईंना मिळालं होतं. त्यावेळी माझ्या बाजूने संपूर्ण पक्ष होता, तरी आम्हाला ते चिन्ह मिळालं नव्हतं. आता शिवसेनेत २/३ पेक्षा अधिक आमदार व खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल,” असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते; रामदास आठवलेंचं वक्तव्य

“धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचाच हक्क”

“उद्धव ठाकरे यांच्याकडे १५ आमदार आहेत. सहा खासदार आहेत. त्यामुळे त्यांनाही मान्यता मिळेल, मात्र दुसरं पक्षचिन्ह घ्यावं लागेल. धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचाच हक्क आहे,” असंही आठवलेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale say pm narendra modi have no worry when i am with him rno news pbs
First published on: 16-08-2022 at 20:43 IST