राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या भाषणामधील वक्तव्यांवरुन सध्या वाद पेटला आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु आहे. राज्यामधील वेगवेगळ्या भागांमध्ये ब्राह्मण समाजाकडून मिटकरींविरोधात संताप व्यक्त केला जातोय. गुरुवारी पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून मिटकरींविरोधात आंदोलन करण्यात आलं असता वातावरण चांगलंच तापलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. दरम्यान आता या प्रकरणावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> “…तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडायला नको होती”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

हा नेमका वाद काय आहे?
सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात एक किस्सा सांगितला होता. “आपला बहुजन समाज कधी दुरुस्त होईल काय माहित. आचमन करा…”, असं म्हणत मिटकरींनी मंचावर बसलेले मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेत पुढे बोलणं सुरु ठेवलं. “मुंडे साहेब एका ठिकाणी गेलो मी मुलीचा बाप म्हणाला बसा साहेब कन्यादान आहे. म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का हो? नाही म्हणे असतो ना… आम्हाला शिकवलंय असतो. बसा म्हणाले मी बसलो खुर्चीवर. बरं नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली,” असं मिटकरी यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> रामदास आठवले म्हणतात, “मुंबईत भाजपाचा महापौर झाला तर…”

यानंतर मिटकरी काही मंत्र म्हणाले. नंतर त्यांनी लग्न लावणारे ब्राह्मण (गुरुजी) सांगतात त्याप्रमाणे डोळ्याला पाणी लावा असं सांगितलं. नंतर ते गुरुजींच्या शैलीमध्येच, “तुमचा हात माझ्या हातात द्या,” असं म्हणाले. हे ऐकून मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हसू लागले.

नक्की पाहा >> राष्ट्रवादीचे मिटकरी नेमकं काय म्हणाले ज्यामुळे ब्राह्मण समाजाने संताप व्यक्त करत पुण्यात आंदोलन केलंय; पाहा ‘तो’ Video

पुढे बोलताना मिटकरींनी, “आचमन करा, धुपम्, दिपम् नमस्कारम्…” असं म्हणत पुन्हा मंत्र म्हटले. मंत्र म्हणताना त्यांनी, “मम भार्या समर्पयामि” असं वाक्य म्हटलं. मिटकरींनी पुढे बोलताना, “मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. म्हटलं अरे येड्या ते महाराज असं म्हणतायत.. मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा.” यानंतर सर्वच उपस्थित हसू लागले. “आरारा… कधी सुधरणार आपण. ही लोक आम्हाला हनुमान चालीसा सांगायला लागली,” असंही मिटकरी म्हणाले.

नक्की वाचा >> “धरणात मुतायची मिजास केली म्हणून…”; अमोल मिटकरींचा पवार कुटुंबावर टीका करणारा जुना Video शेअर करत मनसे म्हणते, “थोर विचार…”

दरम्यान, या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे. अशातच आता या प्रकरणावर पुण्यामधील पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवलेंनी भाष्य केलंय.

नक्की वाचा >> “…म्हणून राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये”; ठाकरे सरकारने लक्ष घालावं म्हणत आठवलेंची मागणी

आठवले काय म्हणाले?
आठवले यांनी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेट मिटकरींचा उल्लेख करत या प्रकरणावरुन भाष्य केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी नाहीत अशी आपली पूर्वीची भूमिका कायम ठेवतानच आठवलेंनी मिटकरींवर मात्र टीका केलीय.

नक्की वाचा >> “तुमचे दादा, साहेब आणि ताईंना कधीतरी…”; अमोल मिटकरींना मनसेचं खुलं आव्हान

“शरद पवार यांच्यामुळे जातीवाद वाढला नाही,असं माझं मत आहे. पण त्यांच्या काही लोकांमुळे जातीवाद वाढला आहे. अमोल मिटकरींसारखे लोक आहेत जे समाजात तेढ निर्माण करतात. मिटकरींचा निषेध व्यक्त करतो, पवार जातीयवादी नाहीत,” असं आठवले यांनी म्हटलंय.