Ramdas Athawale Statement on Muslims Bakri Eid Mira Road Controversy: मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईतील काही गृहसंकुलांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बकऱ्या आणण्यास व त्यांची कुर्बानी देण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला होता. या वादामुळे मीरा रोड, घाटकोपर, गोरेगाव यांसारख्या भागांत मोठा तणाव निर्माण झाला होता. या संपूर्ण पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारमधील मंत्री आणि ‘रिपाई’चे (RPI-A) प्रमुख रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बुधवारी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी “भारतातील मुस्लिम हे औरंगजेबाची नव्हे, तर आपलीच अवलाद आहेत,” असे वक्तव्य करत धार्मिक भावना न भडकवण्याचे आवाहन केले.
रामदास आठवले नेमके काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत मीरा रोड येथील वादावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रामदास आठवले यांनी अत्यंत परखड मत मांडले. “मुस्लिम समाजाने जर सणासाठी बकऱ्या आणल्या असतील, तर त्याला लगेच विरोध करण्याची गरज नाही. मुघल भारतात येण्यापूर्वी येथील मुस्लिम बांधव हे हिंदूच होते. मुघल आल्यानंतर येथील हिंदूंचे धर्मांतर झाले. त्यामुळे भारतातील मुस्लिम हे काही औरंगजेबाची अवलाद नाहीत, ते आपलीच (हिंदूंची) अवलाद आहेत, अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे सगळे लोक एकत्र राहत होते. आता राजकीय फायद्यासाठी कोणीही धार्मिक भावना भडकवू नयेत. मग ते भाजपचे लोक असोत किंवा इतर कोणी, अशा पद्धतीने कोणालाही विरोध केला जाऊ नये.”
संविधानाचा आदर करा
“भारताचे संविधान सर्वांसाठी समान आहे. संविधानाला छेद देणारे काहीही घडता कामा नये. कोणाच्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.”
काय आहे मीरा रोड येथील गृहसंकुलात बकरी ठेवल्याचा वाद?
मीरा रोड येथील ‘पूनम क्लस्टर’ या गृहसंकुलात (सोसायटी) काही मुस्लिम रहिवाशांनी बकरी ईदसाठी बकऱ्या आणल्या होत्या. यावरून सोसायटीमध्ये दोन गटांत तीव्र वाद झाला होता.
- आंदोलन आणि घोषणाबाजी: हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा निषेध करत सोसायटी परिसरात आंदोलन केले. आंदोलकांकडून हनुमान चालीसा पठण आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
- किरीट सोमय्यांची एन्ट्री: या वादात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडी घेतली. त्यांनी संबंधित सोसायटीला भेट देऊन स्थानिक मुस्लिम नेत्यांवर गंभीर आरोप केले.
- सध्याची स्थिती: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मीरा रोडमध्ये सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालिकेच्या नियमांनुसार, त्या बकऱ्या प्रशासनाने निर्धारित केलेल्या ठिकाणी हलवल्या असून खबरदारीचे सर्व उपाय योजले आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
रामदास आठवले हे केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी ‘एनडीए’ (NDA) चे घटक पक्ष आहेत. असे असतानाही त्यांनी थेट भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता आठवलेंच्या या ‘घरच्या आहेरा’वर भाजप काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अखेर मिरा रोड येथे शांततेत बकरी ईद साजरी
मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड येथे अखेर शांततेत बकरी ईद साजरी करण्यात आली. यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. मिरा रोड परिसरात मुस्लिम नागरिकांची संख्या मोठी असल्याने बकरी ईदनिमित्त विविध ठिकाणी तयारी करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी पुनम क्लस्टर या गृहसंकुलात काही मुस्लिम बांधवांनी बकरे आणल्यानंतर त्यावर संकुलातील काही रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी उडी घेतल्याने प्रकरणाला धार्मिक वळण लागले होते.
