Ramdas Athawale On Abhijeet Dipke : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात २ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन पार पडलं. मुंबईतील आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. सीजेपीच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनात बोलताना अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केल्याच्या मुद्यांवरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभिजीत दिपके यांना अतिशय कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘जर अभिजीत दिपकेंनी अशा प्रकारची वक्तव्य करणं थांबवलं नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेईल’, असा इशारा आठवले यांनी दिला आहे. तसेच ‘अभिजीत दिपकेंच्या डोक्यात सध्या हवा गेलीय’, असं म्हणत रामदास आठवले यांनी आज मुंबईत माध्यमांशी बोलताना दिपके यांना सुनावलं आहे.
रामदास आठवले काय म्हणाले?
मुंबईत पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी दिपके यांच्या एका विधानावर आक्षेप घेतला. रामदास आठवले म्हणाले की, “जवाहरलाल नेहरू यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अधिकार दिले हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. अभिजीत दिपके यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत. दिपके यांनी अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य करू नये.”
‘अभिजीत दिपकेंच्या डोक्यात हवा गेलीय’
अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “मला वाटतं की अभिजीत दिपके यांच्या डोक्यात हवा गेली आहे. अभिजीत दिपके हे आंबेडकरवादी नाहीत. दिपके यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत केलेल्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. मात्र, आता पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणं योग्य नाही. दिपके यांची मोदींवर बोलण्याची पात्रताही नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका करणं योग्य नाही. जर अभिजीत दिपके हे अशाच पद्धतीने बोलत राहिले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या विरोधात कडक पावलं उचलेल”, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला.
अभिजीत दिपकेंनी मोदींवर टीका करताना काय म्हटलं होतं?
मुंबईतील आंदोलनात अभिजीत दिपके भाषण करत असताना आंदोलकांनी मेलोडी, मेलोडी अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. दिपके म्हणाले होते की, “मेलोडी खायचे तर खा, त्याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. मात्र, ज्या कामासाठी तुम्हाला जनतेने निवडून पाठवलं, ते काम करा”, अशा शब्दांत अभिजीत दिपके यांनी मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला होता.
अभिजीत दिपकेंनी फडणवीसांना काय इशारा दिला होता?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही ३ दिवसच जेलमध्ये टाकायचं बोलले. पण जर ३ महिने बोलले असते तर संपूर्ण मुंबई बंद पडली असती. तुमची खुर्ची तर आधीच धोक्यात आहे. तुमच्या खुर्चीचा एक पाय फेव्हिकॉलचा आहे, तर दुसरा पाय फेव्हिस्टिकने चिकटवलेला. कधी तो खुर्चीचा पाय पडेल आणि तुमची खुर्ची जाईल हे सांगता येत नाही. मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि या महाराष्ट्राला काही वारसा आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा हा महाराष्ट्र आहे. हे तुम्ही विसारले असाल पण आम्ही विसरलो नाही. या महाराष्ट्रात अशा धमक्या दिल्या जात नाहीत. तुम्ही काय बोलले होते, आंदोलन केलं तर जेलमध्ये जावं लागेल. याचा अर्थ आम्हाला जेलमध्ये टाकायचं होतं का? आम्हा सर्वांना जेलमध्ये टाका. देवेंद्र फडणवीस साहेब फक्त ३ दिवस नाही तर ३ महिने जेलमध्ये टाका. जेलमधून बाहेर आल्यानंतर मी पुन्हा ती घोषणा देईन जी तुम्ही द्यायचे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन”, असं म्हणत दिपके यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती.
