“राज ठाकरे हा कोणाचंही न ऐकणारा नेता असून त्यांच्या भूमिकेला भाजपाचा पाठिंबा नाही,” असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. रविवारी सांगली येथे पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, असंही ते यावेळी म्हणाले.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून बाळासाहेबांना धोका दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. अंगावर त्यांनी भगवे वस्त्र धारण केलं, ते चांगलं आहे. पण राज ठाकरेंनी शांततेची भूमिका घ्यावी. त्यांनी पक्ष स्थापन करताना सर्व रंगाचे झेंडे आणले होते. पण आता केवळ भगवा रंग परिधान केला आहे. त्यांनी शांततेसाठी काम करायला हवं, पण भगव्या रंगाच्या विरोधात त्याचं काम सुरू आहे, अशी टीकाही आठवले यांनी केली.

काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर मी होतो. पण त्यांचा सिम्बॉल घेऊन मी निवडणूक लढवली नाही. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सिम्बॉल घेऊन निवडणूक लढवणार असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी सरकारच्या कामांबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडीचं सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरलं आहे. या सरकारमधील नेते एकमेकांवर कुडघोड्या करण्याचं काम करत असतात. या सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला डावललं जातं. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, अशी विनंती मी त्यांना करणार आहे. सरकार पडल्यानंतर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, याला माझाही पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे नेते आहेत.