महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणाचे पडसाद अद्यापही पडत आहेत. मशिदींवरचे अजानचे भोंगे हटवले नाहीत तर त्यांच्यापुढे मोठ्या आवाजात मंदिरांवर हनुमान चालिसा लावली जाईल, अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याच संदर्भात केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांनीही भाष्य केलं आहे.


याबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले,”कोणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणं योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, तिथे आहेत, मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचं आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद आहे. “


काय म्हणाले होते राज ठाकरे?


राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना म्हणाले की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा”.